Dhirendra Krishna Shastri : 'बागेश्वर धाम सरकार' (Bageshwar Dham) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Maharaj) यांचा कार्यक्रम आज मीरा-भाईंदरमध्ये होत आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही आज मीरा रोड परिसरात हा कार्यक्रम पार पाडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर उपस्थित शेकडो भक्तांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं जोरदार स्वागत केलं. 


धीरेंद्र महाराजांचा मीरा-भाईंदरमध्ये कार्यक्रम


धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आज मीरा-भाईंदरमध्ये कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं दिव्य दर्शन होणार आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारीही आयोजकांकडून करण्यात आली आहे. आज पहाटे चार वाजता त्यांचं मुंबईत आगमन झालं. मात्र त्यांच्या आगमनापूर्वीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मीरा भाईंदर काँग्रेसतर्फे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यात आला आहे. अंनिसवतीने शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबई दौरा सफल होणार का हे आता पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.


बागेश्वर धामच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध


मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात 18 आणि 19 मार्च दोन दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज मीरा रोड येथे महादिव्य दरबार सजणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसने विरोध केला आहे. नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. दुसरीकडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, 'बागेश्वर धाम हे बुवा धर्माच्या आडून अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या कार्यक्रमाच्या नावाखाली, जाहीरपणे अवैज्ञानिक दावे करत आहेत. त्यामध्ये ते भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य सर्रास नाकारुन समाजात चमत्काराचा प्रचार-प्रसार करतात, त्यांना स्वतःला प्राप्त झालेल्या दैवी कृपेमुळे ते लोकांच्या मनातील भावना, इच्छा, प्रश्न, समस्या ओळखतात, कागदावर लिहितात, त्यावर दैवी तोडगेही सुचवतात. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणखीनच दृढ होण्यास मदत होते, असे महाराष्ट्र अंनिसचे स्पष्ट मत आणि म्हणणं आहे.'


काँग्रेसची कार्यक्रमाविरोधात पोलिसांत तक्रार


बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे. तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच मीरा-भाईंदर कॉंग्रेसतर्फे बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यात आला आहे. शुक्रवारी मीरा रोड पोलीस ठाण्यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लेखी तक्रार ही दाखल केली आहे. या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास तर बागेश्वर धाम सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर आयोजकांनी बागेश्वरधाम तर्फे रविवारी 19 मार्च तारखेला विभूती वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. विभूतीद्वारे भाविकांच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. 


विश्व हिंदू परिषदेचा बागेश्वर महाराजांना पाठिंबा


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जरी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला विरोध केला असला तरी विश्व हिंदू परिषदेने धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा जोरदार समर्थन केलं आहे. 'हिंदू धर्मातील संत आणि मंदिरांमध्ये खूप शक्ती असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोक श्रद्धेने त्यांच्याकडे जातात यात चूक काय', असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी विचारला आहे. 'काही लोकांना फक्त हिंदू धर्मामध्येच वाईटपणा दिसून येतो. ख्रिस्ती लोकांच्या चंगाई सभेसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले कधीच काही करत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले भेदाभेद करतात त्यांचा उद्दिष्ट शुद्ध नाही', असंही मिलिंद परांडे म्हणाले.