Tuljapur Drugs Case : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता मुंबई कनेक्शन पुढे आले असून मुंबईतून एका महीलेकडून हे ड्रग्स खरेदी केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. तुळजापूर (Tuljapur) शहरात ड्रग्स घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोल नाक्यावर पोलिसांनी अटक केलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीत हे ड्रग्स स्वतःसाठीच खरेदी केल्याची आरोपींनी कबुली दिली असून त्या संदर्भात कबुलीनामा ही देण्यात आला आहे.  मात्र या घटणेमुळे शहरात ड्रग्ज विक्रीचे रॅकेट असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त करत त्या दिशेने तपास सुरू केला आहे.  


 तीन पैकी दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार


दरम्यान, तुळजापूर सारख्या शहरात ड्रग्ज आढळून आल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे. तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण?, तुळजापूर शहरात कुठे ड्रग्स विक्री केली जाणार होती? या संपूर्ण बाबीचा आता पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. यात पोलिसांनी आरोपींकडून  45 ग्रॅम ड्रग्स जप्त केलं असून यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एम डी ड्रग्स तस्करी प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे ही पुढे आले आहे. संदीप राठोड विरोधात नळदुर्ग पोलिसात गुटखा तस्करीसह पाच गुन्हे आहेत. तर अमित अरगडे विरोधात ही दोन गुन्हे दाखल आहे. 


बंदूक अन् धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार, गुन्हा दाखल


साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. साई भक्ताचेच वाहन अडवून त्यांना बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून ही लूटमार झाली आहे. गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते. त्यांची गाडी  लासलगावमार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली.


यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली आहे. मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख 800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


हे ही वाचा