Delhi Acid Attack : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये (New Delhi) बुधवारी (14 सप्टेंबर) एका शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान आरोपींनी अॅसिड हल्ल्याचा कट कसा रचला हे देखील समोर आलं आहे.
दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी मुलीवर अॅसिड फेकलं
दिल्लीतील द्वारका परिसरात ही घटना घडली. 17 वर्षीय मुलगी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी तिच्यावर अॅसिड फेकलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. आरोडाओरडा करत जखमी अवस्थेतील ही तरुणी कुटुंबियांकडे पोहोचली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
सचिन अरोर मुख्य आरोपी, आज कोर्टात हजर करणार
पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. आज या तिघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, या संपूर्ण घटनेचा मुख्य आरोप सचिन अरोरा आहे. हे कृत्य करण्यासाठी सचिनने हर्षित आणि वीरेंद्र सिंह या आपल्या दोघ मित्रांची मदत घेतली.
पीडितेसोबत ब्रेकअप आणि ऑनलाईन अॅसिडची खरेदी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सचिन अरोरा आणि पीडित मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. तीन महिन्यांपूर्वी या मुलीने आरोपीसोबत ब्रेकअप केलं होतं आणि त्याच्यासोबत बोलणं पूर्णत: बंद केलं होतं. यानंतर चवताळलेल्या आरोपीने मुलीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने अॅसिड हल्ल्याचा कट रचला. सचिनने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन (फ्लिपकार्ट) अॅसिड मागवलं आणि हर्षित तसंच वीरेंद्रच्या मदतीने पीडितेवर फेकलं.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : अरविंद केजरीवाल
दरम्यान दिल्लीतील या घटनेवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्वीट करुन म्हटलं की, "अशाप्रकारच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाही. आरोपींची एवढी हिंमक कशी झाली. आरोपींना कठोर शिक्षा मिळायला हवी. तर दिल्ली महिला आयोगाने पोलीस आणि सरकारच्या गृह विभागाला नोटीस जारी करुन अॅसिडच्या विक्रीवर बंदी प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे.