Dawood Ibrahim:  केंद्रीय तपास संस्था राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency- NIA) टेरर फंडिंग प्रकरणात मोठा दावा केला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून (Dawood Ibrahim) पैसे पाठवण्यात येत होते. त्यासाठी हवाला मार्गाचा वापर दाऊदकडून करण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. मागील 4 वर्षांत हवालाद्वारे दहशतवादी कारवायांसाठी सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांची रसद दाऊदने भारतात पाठवली असल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. 


दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी काहींना अटक केली असून चौकशीदेखील सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने हवाला रॅकेटचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने दहशतवादी कारवायांसाठी मुंबईत 25 लाख रुपये पाठवले होते, असेही एनआयएने म्हटले आहे. 


मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठे हल्ले घडवण्यासाठी दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकीलने दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये पाठवले असल्याचे एनआयएने म्हटले. हा पैसा सुरतमधून भारतात आला होता. त्यानंतर तेथून मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यापर्यंत पोहोचवले गेले.


मागील चार वर्षात हवालाद्वारे दहशतवादी निधीसाठी जवळपास 12 ते 13 कोटी रुपये भारतात पाठवण्यात आले असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानातून भारतात आणलेले 25 लाख रुपये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आले होते असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले. शब्बीरने 5 लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. शब्बीरच्या घराची 9 मे 2022 रोजी झडती घेतली असता त्याच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.


एनआयएने काही दिवसांपूर्वीच विशेष कोर्टात टेरर फंडिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. एनआयएने आरिफ अबुबकर शेख उर्फ ​​आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख उर्फ ​​शब्बीर, मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, दाऊद इब्राहिम कासकर उर्फ ​​शेख दाऊद हसन आणि शकील शेख उर्फ ​​छोटा शकील यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. 


डी गँग अथवा छोटा शकीलच्या नावाने सलीम फ्रूट हा खंडणी गोळा करत असे. एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणीबाबतची तक्रार नोंदवल्यानंतर सलीमला अटक करण्यात आली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईकदेखील आहे. त्याच्या माध्यमातून खंडणीचा पैसा देशाबाहेर जात असल्याचा आरोप आहे.