मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी (Dapoli Sai Resort scam ) ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीची14 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. 


कोठडीत असताना औषधं घेण्याची परवानगी


सदानंद कदम यांना कोठडीत असताना औषध घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. कदम यांना ब्लड प्रेशर असल्याची माहिती त्यांचे वकील निरंजन मुदरगी यांनी दिली आहे. मात्र घरचं जेवण देण्यास ईडीने विरोध केला आहे. सदानंद कदम यांचा डाएट प्लॅन सुरू असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक महिन्यांपासून गाजत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब  यांचे व्यावसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.


अनिल परब यांनी आरोप फेटाळले


आपला या रिसॉर्टशी काहीही संबंध असून जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. असे असले तरी सदानंद कदम यांना अटक झाल्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे.  सदानंद कदम हे रामदास कदमांचे भाऊ आहेत. दोन भावांमधली कोकणी भावकी सर्वश्रूत आहे. सदानंद कदम राजकारणात फार सक्रीय नाहीत पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. सदानंद कमद आणि रामदास कदम यांच्यातून विस्तव जात नाही. सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन 2020 ला विकत घेतली. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा ईडीचा आरोप आहे.