Senior Citizen Duped For 112 Crore: मुंबई : देशात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. अनेकांना सायबर भामटे लोखो, कोट्यवधींना गंडा घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. जनजागृतीचा अभाव आणि झटपट श्रीमंत होण्याची लालसा यांमुळे मोठ्या प्रमाणात लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडत आहेत. NCRB च्या अहवालानुसार, 2022 मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची 65893 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनं भिरभिरलं तोच मुंबईत एक सायबर गुन्ह्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. 


शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचं आश्वासन देऊन, एका ज्येष्ठ नागरिकाची 1.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी भरत दीपक चव्हाण याला शुक्रवारी वांद्रे उपनगरातून अटक करण्यात आली. त्याच्या 33 बँक खात्यांमध्ये जमा केलेले 82 लाख रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. 


नेमकं काय घडलं? 


एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत दीपक चव्हाण यानं अनेक बँक खाती उघडली होती. त्यापैकी 1.12 कोटी रुपये डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान मिळाले आहेत. मुंबईत राहणारे आणि वयवर्ष 68 असणारे तक्रारदार संदीप देशपांडे यांनी पोलिसांना सांगितलं की, डिसेंबरमध्ये त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून अनेक व्हॉट्सॲप मेसेज आले. या मेसेजमध्ये शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा असल्यामुळे ते त्या ग्रुपमध्ये सामील झाले. 


...अन् शंकेची पाल चुकचुकली 


आरोपी भरत दीपक चव्हाण यांनी संदीप देशपांडे यांच्या नावानं ट्रेडिंग खातं उघडल्याचं त्यांना सांगितलं. तसेच, देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं दाखविण्यात आलं. तक्रारदार देशपांडे यांनी त्यांना झालेला नफा चव्हाणकडे मागितला. मात्र, तुम्हाला जर नफ्याची रक्कम हवी असेल तर त्यासाठी आगाऊ कराचा भरणा करावा लागेल, असं सांगितलं. त्यावेळी देशपांडे यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ सायबर सेलमध्ये धाव घेतली आणि घडला सगळा प्रकार सांगितला.


पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या सहाय्यानं आरोपी संदीप चव्हाणचा माग काढला. त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.