Cyber Crime News मुंबई: प्राप्तीकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर (Cyber Crime News) चोरट्यांनी 25 लाख रुपयांना लुबाडले. जेट एअरव्हेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबधित मनी लॉड्रींग प्रकरणात महिलेचा सहभाग असल्याची भीती दाखवून आरोपींनी ही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
तक्रारदार महिला 2011 मध्ये प्राप्तीकर विभागातून निवृत्त झाल्या असून सध्या त्या गोरेगाव येथे कुटुंबियांसोबत राहतात. 12 नोव्हेंबरला त्यांना अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने आपण क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असून तुमच्या क्रेडिटकार्डवर अडीच लाख रुपये थकीत असल्याचे त्यांना सांगितले. याबाबत बंगळुरू येथे याचिका दाखल असून तुम्हाला तेथे यावे लागेल, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यांनी मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मला येता येणार नाही, असे सांगितले. त्यावर त्यांनी बंगळुरू सिटी पोलीस तुम्हाला दूरध्वनी करतील, असे सांगितले. त्यानंतर काही वेळात महिलेच्या मोबाईलवर बंगळुरू सीटी पोलिसांच्या नावाने एक व्हिडीओ कॉल आला. त्याने तुमच्या खात्यातून दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले.
तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी भीती घातली-
मनीलॉड्रींग प्रकरणात अटकेत असलेले जेट एअरव्हेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याकडे तुमच्या बँक खात्याचे पासबुक मिळाले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी भीती घातली. तसेच अटक टाळायची असेल, तर 10 टक्के कमिशन भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर सीबीआयच्या नावाने तक्रारदार महिलेला नोटीस पाठवण्यात आले. त्यात गोयल प्रकरणातील प्रमुख संशयीत असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीनी नॅशनल सिक्रेट लॉनुसार घरातच वृद्ध महिलेला व्हिडीओ कॉलसमोर ठेवत डिजिटल अटक केली असलयाचे सांगितले. तसेच याबाबत कोणालाही काहीही न सांगण्यास दबाव टाकला. तसेच आरोपीनी महिलेला 25 लाख रुपये दिलेल्या खात्यावर वळते करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी वृद्ध महिलेला दिलेल्या पावतीवर प्राप्तीकर व रिझर्व बँकेचे दोन्हीचे लोगो होते. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी सायबर पोलिसांच्या हेल्पलाईनला दूरध्वनी करून तक्रार केली. त्यानुसार 2 जानेवारीला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
बाप आहे की सैतान...; मुंबईतील भयावह घटना-
वडाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांनी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्यात पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन केल्याचा जात होते. 16 वर्षीय मुलगी झोपेत असताना वडिलांकडूनच मुलीला चुकीचा स्पर्श केला जात होता. मुलीने याबाबत कोणाला सांगितल्यास तिला नग्न घराबाहेर काढण्याची धमकी आरोपी वडिलांकडून दिली जात होती.