मुंबई :  अलीकडच्या काळात नागरिकांची वेगवेगळ्या मार्गानं फसवणूक केली जात आहे. डिजीटलयाझेशनच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याची प्रकरणं वाढली आहेत. नागरिकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या लिंक किंवा अॅप डाऊनलोड करण्याशी संबंधित लिंक पाठवून त्यांच्या फोनचा ताबा मिळवत फसवणूक केली जाते. महाराष्ट्र पोलीस आणि सायबर पोलिसांकडून नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचं आवाहन वेळोवेळी करण्यात येतं. याशिवाय सायबर गुन्हे रोखण्यासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून देखील मार्गदर्शन केलं जातं. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मोठ्या संख्येनं लग्नाच्या तिथी आहेत. या काळात देशभरात मोठ्या संख्येनं लग्न होणार असल्यानं सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन पद्धतीनं लग्नपत्रिका पाठवून नागरिकांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागृती करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे. 


पुणे येथील सायबर अवेअरनेस फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्यचे प्रमुख धनंजय देशपांडे यांनी नागरिकांना एका नव्या सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहनं केलं आहे. ते म्हणाले, सध्या 20 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत भारतात 48 लाख लग्न लागतील असा अंदाज इकोनॉमिक्स वर्ल्ड फोरमनं केलेला आहे. त्याला ज्वेलरी सुपर मार्केटनं मान्यता दिलेली आहे, असा दावा देशपांडे यांनी केला आहे. सायबर गुन्हेगारांनी याचा फायदा घेण्यासाठी व्हायरस कनेक्टेड लिंक असलेल्या लग्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, त्यामध्ये डुप्लिकेट नावं असतील. तुम्हाला त्या कदाचित पुढच्या काही दिवसात येतील. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावण्यात येत आहे, असं लिहिलेलं असेल. मात्र, त्यात काय खरं नसतं. त्या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर व्हायरस सक्रीय होतो, त्यानंतर तुमचा मोबाईल हॅक करतो. तुमच्या फोनचा एक्सेस सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकतो. त्यातून मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं देशपांडे म्हणाले. 


कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी


धनंजय देशपांडे यांनी याबाबत एक सल्ला दिला आहे. तुमच्या फोनमध्ये जे नंबर सेव्ह नाहीत, अशा क्रमांकावरुन आलेल्या पत्रिका उघडू नका. पीडीएफ फाईल असली ती उघडू नये, असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. 


दरम्यान, नागरिकांनी सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही फोनवरुन विचारणा झाल्यास बँक खात्यांबाबत माहिती देऊ नये. याशिवाय मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक देखील अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नका. सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. 




इतर बातम्या : 


अमेरिकेनंतर केनियाचा अदानींना धक्का, 6 हजार कोटींच्या प्रकल्पाचा करार रद्द, अदानींच्या कंपन्यांचे शेअर गडगडले