Adani Group Crisis मुंबई : अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समोरील संकटात वाढ जाली आहे. अदानी समुहाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अमेरिकेतली एका न्यायालयानं अदानी ग्रुपच्या ग्रीन एनर्जी कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रातील कंत्राट मिळण्यासाठी लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याच्या आरोपावरुन अटक वॉरंट गौतम अदानींसह इतरांना बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आज अदानी समुहांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर केनियानं देखील मोठा निर्णय घेत अदानी समुहाला धक्का दिला आहे. केनिया सरकारनं अदानी समुहासोबतचे विमानतळ विस्तार आणि पॉवर ट्रान्समिशनसंदर्भातील करार रद्द करण्याची घोषणा केली. जवळपास 6 हजार कोटींच्या प्रकल्पाचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 


केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेतील कोर्टानं अदानी ग्रुपच्या काही सदस्यांना अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्यानंतर केनियानं हा निर्णय घेतला.  


अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी गौतम अदानी यांच्यावर भारतातील सौर ऊर्जा  प्रकल्पाची कंत्राटं मिळवण्यासाठी नियम अटीमध्ये अनुकूल ठरतील असे बदल करण्यासाठी 26.5 कोटी डॉलर म्हणजे 2200 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्व शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. 


 केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो म्हणाले , त्यांच्या ऊर्जा मंत्रालयानं पॉवर ट्रान्समिशनच्या लाईनच्या निर्मिती साठी अदानी समुहाच्या एका कंपनीसोबत केलेला 700 दशलक्ष डॉलरचा करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय आमच्या तपास यंत्रणा आणि भागिदार देशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घेण्यात आला आहे.  यावेळी त्यांनी अमेरिकेचं नाव घेतलं नाही. 


अदानी समुह आणि केनिया सरकार यांच्यात नैरोबीमधील मुख्य विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी करार केला जाणार होता. या विमानतळाचं विस्तारीकरण करण्याच्या मोबदल्यात नैरोबीचं विमानतळ 30 वर्ष अदानी ग्रुपला चालवण्यास मिळणार होतं. या प्रस्तावित कराराला केनियात विरोध झाला होता, स्थानिक विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. 


फोर्ब्स रिअल टाईम बिलियनर इंडेक्स नुसार गौतम अदानी यांची संपत्ती 59.3 अब्ज डॉलर  होती. आजच्या शेअर बाजारातील सत्रात अदानी उद्योग समुहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेससह इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. काही कंपन्यांच्या शेअरला लोअर सर्किट लागलं. अदानी समुहाच्या 10 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत. आज त्या सर्व कंपन्यांचं मिळून बाजारमूल्य 2.19 लाख कोटी रुपयांनी कमी झालं  आहे. हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट आला होता तेव्हा जेवढं नुकसान झालं होतं त्यापेक्षा दुप्पट नुकसान यावेळी झालं आहे. 


अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी आणि अन्य एका फर्मवर भारतात कंत्राट मिळवण्यासाठी सुमारे 2236 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अमेरिकन कोर्टातील आरोपपत्रात करण्यात आलेले आरोप अदानी समुहानं फेटाळले आहेत.  


इतर बातम्या :


लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!