अहमदनगर : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीतील मुलीच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चाकू, एअरगन, चॉपर यासह हत्यारे घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवानं या हल्ल्यात मुलगा बचावला आहे.


नेवासा येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याचा पाथर्डीतील मुलीसोबत एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. शनिवारी दुपारी नेवासे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील कडू गल्ली येथे वाघच्या घरासमोर तीन-चार चारचाकी वाहने आली. एका गाडीतून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषिकेश खेडकर व एक अनोळखी उतरले. दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रशांत वर त्यांनी हत्याराचा वार केला. परंतु, मध्ये मोटारसायकल असल्याने वार चुकला. त्यामुळे प्रशांत जिवाच्या आकांताने ओरडत घरात पळाला. यावेळी मुलीच्या भावाने त्याच्याकडे पिस्तुल रोखले. इतर गाड्यातून आलेल्या व्यक्तींच्या हातात चाकू, रॉड, एअरगन होत्या. यावेळी याला मारा, सोडू नका असा आवाज सुरू झाला. मात्र, प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले. हे पाहून आरोपी आपापल्या गाड्यांत बसून नेवासेफाट्याच्या दिशेने पळाले.


प्रशांतने पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानस हिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले. पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले. परंतु, माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर व त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले, अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासे पोलिसात दिली. सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म अॅक्ट दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिलीय.