Mumbai Crime News Update : मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक चोरीच्या प्रकरणांमध्ये विश्वासू नोकरांचा सहभाग अधिक असल्याचे देखील आढळून आले आहे. अशीच एक घटना चारकोप परिसरात घडली आहे. सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातून नोकराने 423 ग्रॅम सोनं घेऊन पळ काढला होता. या सोन्याची किंमत 23 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. दहिसर पोलिसांनी सिम कार्ड विक्रेत्याचा वेश धारण करून आरोपीला राजस्थानच्या पाली येथून अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. राजू सिंह ( वय, 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप येथील सोने बनवण्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या नोकऱ्यानेच चोरी केल्याची तक्रार दहिसर पोलिसांना मिळाली होती. या कारखान्यात वेगवेगळ्या सोन्याच्या दुकानातून सोने आणून नवीन दागिने बनवण्याचे काम केले जात असे. याच कारखान्यात मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या राजू सिंग याला मालकाने 423. 95 ग्रॅम सोन्याचा रॉड आणण्यासाठी पाठविले होते. मात्र, तो सोन्याचा रॉड घेऊन कारखान्यात न येता मोबाईल बंद करून रॉड घेऊन फरार झाला. त्यामुळे कारखान्याच्या मालकाने दहिसर पोलिस ठाण्यामध्ये चोरीची तक्रार दिली होती.
सोने चोरीची तक्रार दिल्यानंतर दहिसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी राजस्थान येथील पाली जिल्ह्यात असल्याचं निष्पन्न झालं. ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांचे तपास पथक राजस्थान येथे पोहोचले. तपास पथकातील पोलिसांनी वेशांतर करून सिम कार्ड विक्रेते बनवून आरोपीची माहिती मिळवली. त्यानंतर सापळा रचून आरोपी राजू याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचं 423 ग्रॅम सोनं जप्त केले.
पोलिसांचा तपास सुरु -
सोन्याची चोरी करणारा संशयित आरोपी राजू सिंग सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. याबरोबरच त्याने यापूर्वी अशी चोरी केली आहे का? याबाबतची चौकशी पोलिसांकडून सूरु आहे, अशी माहिती दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या