Crime News नालासोपारा: नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने तिच्या २० वर्षीय मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे, या हत्येमध्ये पीडितेच्या अल्पवयीन लहान बहिणीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी महिला ममता दुबे हिला अटक केली असून, तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवले जाणार आहे.


अस्मिता दुबे (20) ही तरुणी नालासोपारा पश्चिमेतील यशवंत गौरव परिसरातील जय विजय नगरी इमारतीत आपल्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. गुरुवारी दुपारी अस्मिताने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अस्मिताच्या चेहऱ्यावर आलेली सूज, तसेच दोन्ही हातांवर दिसलेली चाव्यांचे निशाण पाहून पोलिसांना शंका आली. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. अहवालात अस्मिताची मृत्यू आत्महत्या नसून गळा आवळून करण्यात आलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले.


नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय म्हणाले?


नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता ही गर्भवती असल्याचे समजल्यावर तिची आई ममता दुबे अत्यंत संतप्त झाली होती. या रागाच्या भरात तिने मुलीला बेदम मारहाण केली. हत्येच्या वेळी तिच्या 17 वर्षीय बहिणीने अस्मिताचे पाय धरले, तर ममताने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.


आईने आत्महत्येचा बनाव रचला आणि पोलिसांना खोटी माहिती दिली-


हत्यानंतर, हा प्रकार दडपण्यासाठी आईने आत्महत्येचा बनाव रचला आणि पोलिसांना खोटी माहिती दिली की अस्मिताने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १०३, ११५(२), ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिच्या अल्पवयीन मुलीला सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलांची भूमिका तपासली जात असून, या घटनेमागील आणखी काही कारणे किंवा दोषी व्यक्ती असल्याची शक्यता पोलीस तपासात आहे. पुढील चौकशी सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच उघड होणार आहे.


ही बातमीही वाचा:


Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी...


Crime News: लग्नात नाचणाऱ्या महिलांचेही व्हिडीओ विकले, प्रीमिअम क्लिपची किंमत 2000 रुपये; लातूरमधील प्रज्वल तेलीबाबत धक्कादायक माहिती समोर


दुपारच्या हेडलाईन्स, VIDEO: