Nitesh Rane Write Letter To Aaditya Thackeray : शिवसेना आणि शिवसेना नेत्यांवर आरोपांचे बाण सोडणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी आता थेट राज्याचे मंत्री, मुंबई उपनगरचे पालक मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. मुंबई महापालिकेने अद्यापही फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणावरून शिवसेनेवर टीका केली आहे. कोरोनाच्या कठीण काळात  महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं होतं आणि आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही राणे यांनी केला. 


कोरोनाच्या नवीन व्हेरियंट संभाव्य धोक्याबाबत आणि महापालिकेच्या तयारी बाबत सोमवारी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत वस्तुस्थिती लपवली गेली असेल, त्यामुळे सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पत्र लिहीत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. 


नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत  राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा  सत्ताधारी शिवसेनेला पूर्ण करता आलेला नाही.  २६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेले नाहीत, ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब असल्याचे राणे यांनी म्हटले. 


आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम हाती महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण  झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.