Crime News : मुंबईत हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. आकाश रूपकुमार जाधव (वय, 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा भाऊ संशयीत आरोपी अविनाश जाधव (वय, 21) हा फरार झाला आहे. पोलिसांनी आकाश जाधवकडून मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.


Crime News : दोघा भावांनी मिळून घातला अनेकांना गंडा


हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच बनावट वेबसाइट तयार करून आकाश आणि अविनाश हे दोघे भाऊ रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन लोकांची फसवणूक करत होते. या दोन भावांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास डझनभर लोकांची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. आरोपी आकाश याला दहिसर सायबर पोलिसांनी घाटकोपर पूर्व येथून अटक केली आहे.  


याबाबत एका फॅशन डिझायनरने दहिसर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या फॅशन डिझायनरने तिचा 31 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेबसाइटचा या वापर करून मुंबईतील विस्तारा स्टे रिसॉर्ट बुक केले होते. वेबसाईटवर नवीन वर्षात आकर्षक ऑफर्सचे आमिष देण्यात आले होते. हे पाहून डिझायनरने तीन दिवसांसाठी रिसॉर्ट बुक करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये ऑनलाइन जमा केले होते. 28 डिसेंबर रोजी फिर्यादीने रिसॉर्टच्या जेवणाच्या मेन्यूबाबत विचारणा केली असता आरोपी आकाश जाधव याने सांगितले की, आमच्या रिसॉर्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून बीएमसीने रिसॉर्ट बंद केले आहे. त्यामुळे बुकिंगचे पैसे तो परत करणार आहे. परंतु, महिना उलटूनही पैसे परत न झाल्याने फॅशन डिझायनरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी आकाश जाधव याला घाटकोपर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचा दुसरा भाऊ अविनाश जाधव याचाही समावेश असून त्याच्यावर 17 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.


सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही भावांनी हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेतले आणि वेगवेगळ्या बहाण्याने लोकांना पैसे परत केले नाहीत. या दोघांनी मिळून 20 हून अधिक लोकांची फसवणूक केली आहे.


महत्वाच्या बातम्या


शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे खून प्रकरणी चार जणांना जन्मठेप, परभणी जिल्हा न्यायालयाचा निर्णय