Crime News Beed : मुलीचे लग्न लावून देण्यास नकार देणाऱ्या वडिलांची हत्या करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. केज येथील एका तरुणाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला होता. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
९ एप्रिल रोजी केज-कळंब मार्गावर साळेगाव शिवारात शेख फरीद बाबा दर्गाजवळ असलेल्या संत सेना महाराज यांच्या मंदिरा जवळ रमेश एकनाथ नेहरकर (वय ४२, रा. धारूर रोड) हे केज ते कळंब मार्गावरून मोटार सायकल वरून येत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले होते. रमेश नेहरकर यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू होते. मात्र, ११ एप्रिल रोजी रमेश नेहरकर मृत्यू झाला.
प्रकरण काय?
केज तालुक्यातील तांबवा येथील भागवत चाटे याने रमेश नेहरकर यांच्या अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रमेश नेहरकर यांना आरोपी भागवत साठे याने तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, नाहीतर तुम्हाला जीव मारेल अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर दुसऱ्या दिवशीच रमेश नेहरकर यांच्यावर केज कळंब रस्त्यावरील गांजी पाटीजवळ भागवत साठे व त्याच्या दोन साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रमेश नेहरकर हे गंभीर जखमी झाले. जखमी उमेश नेहरकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या नेहरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नेहरकर यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रमेश नेहरकर याचे प्रेत केज पोलीस ठाण्यात आणून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
पोलिसांची कारवाई
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस नाईक अनिल मंदे यांनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले होते.
रमेश नेहरकर यांच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत नेहरकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सुद्धा कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र त्यानंतर या घटनेत आरोपी हे झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशनवरून आरोपी हे केज वरून पुणे मार्गे झाशी येथे गेले. ते तिघे पुन्हा उत्तर प्रदेश या मार्गे परत पुणे येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मिसळे, त्यांच्या पथकातील अनिल मंदे व दिलीप गित्ते पुण्याला रवाना झाले. तिन्ही आरोपींना वाघोली येथून पोलिसांनी अटक केली.
मुख्य आरोपी भागवत संदिपान चाटे, शिवशंकर हरिभाऊ इंगळे आणि रामेश्वर नारायण लंगे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात हात्याचा गुन्हा दाखल झाला होता
तपासात सायबर सेलची महत्त्वाची भूमिका
हल्लेखोर ते वापरत असलेला मोबाईल बंद केला होता परंतु सायबर विभागाने अत्यंत खुबीने ते ज्यांच्या संपर्कात आहेत त्यांचे मोबाईल ट्रेस करून त्यांचे लोकेशन मिळविण्यात यश मिळविले. तिन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून राज्या बाहेर झाशीला गेले होते. परंतु ते पुन्हा रेल्वेने पुणे मार्गे दक्षिणेत जाण्याच्या तयारीत असताना ते पुणे येथे येताच पोलिसांनी त्यांना झडप घालून पुणे येथील वाघोली येथून ताब्यात घेतले.