Lawrence Bishnoi Profile : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या असेल किंवा सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न.. पंजाब पोलिसांपाठोपाठ दिल्ली आणि मुंबई पोलिसांचं पथकही पुण्यात चौकशीसाठी दाखल झालंय. पण या गंभीर गुन्ह्यांचा माटरमाईंड आहे, तिहार तुरुंगातून टोळीचा कारभार चालवणारा अवघा 28 वर्षांचा लॉरेन्स बिष्णोई... देशातील वेगवेगळ्या राज्यात 600 हुन अधिक शार्प शूटरचं नेटवर्क चालवणारा लॉरेन्स गुन्हेगारी क्षेत्रात जेवढा अ‍ॅक्टिव्ह आहे, तेवढाच सोशल मीडियावरही तो अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरील त्याच्या फोटो आणि व्हिडीओंना भुलून अनेक तरुण त्याच्या टोळीकडे आकर्षित होत आहेत. पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे अशाच प्रकारे बिष्णोई टोळीत सामील झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. 


बॉलिवूडमधल्या हिरोपेक्षा कमी नाही..
ज्याच्यावर सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप आहे, ज्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत सहभाग असल्याचं कबूल केलंय तो लॉरेन्स बिष्णोई स्वतः बॉलिवूडमधल्या हिरोपेक्षा कमी नाही. पोलिसांच्या कस्टडीत असतानाही त्याचे काढले जाणारे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळोवेळी पोस्ट होत असतात . त्यासाठी त्याची टोळी काम करते आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बिष्णोई टोळीने पंजाब , हरियाणा , दिल्ली , उत्तर प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश , महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये 600 पेक्षा अधिक शार्प शूटरच जाळं विणलय. पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील संतोष जाधव आणि जुन्नर तालुक्यातील सिद्धेश कांबळे त्याच्या टोळीत सहभागी झालेत.


'अशी' आहे टोळीची कार्यशैली


एका राज्यातील गुन्हेगारांचा उपयोग दुसऱ्या राज्यात गुन्हे करण्यासाठी करून घ्यायचा. त्यानंतर त्या गुन्हेगाराने त्याच्या मूळ गावाकडे पळ काढायचा आणि गंभीर गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता वाढली तर आधीच्या किरकोळ गुन्ह्यांमध्ये स्थानिक पोलिसांच्या हवाली व्हायचं अशी या टोळीची कार्यशैली... त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील संतोष जाधवचा उपयोग आधी राजस्थानमधील गंगापूर जिह्यातील एका व्यापाऱ्यांवर खंडणीसाठी हल्ल्ला करण्यासाठी करण्यात आला, तर पुढे पंजाबमधील सिद्दू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणातही त्याच नाव आलं.  तर त्याचा दुसरा साथीदार सिद्धेश कांबळे याचा पंजाब मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी शोध सुरु करताच तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी पोलिसांना सापडला. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी सिद्धेश कांबळेला अटक झाली, त्याच्या आदल्याच दिवशी दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात त्याच्यावर मोक्का लावण्यात आला.


अवघ्या 28 वर्षांचा लॉरेन्स, टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील..
या बिष्णोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील.. मात्र इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. स्वतः लॉरेन्सवर पन्नास पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने आतापर्यंत केलेले गुन्हे पाहता त्याच्या टोळीकडून सलमान खानला देण्यात आलेल्या हत्येच्या धमकीला मुंबई आणि  दिल्ली पोलिसांनी गांभीर्याने घेतलंय. त्यामुळे पुणे पोलिसांच्या 14 दिवसांच्या कोठडीत असलेल्या सिद्देश कांबळेंची चौकशी करण्यासाठी पुण्यात दाखल झाल्यात. आपण सिद्धेशकडे दीड वर्षांपूर्वी मंचर तालुक्यात झालेल्या राण्या बाणखेले याच्या हत्येचा तपास करत असल्याचं पुणे पोलीस सांगत असले तरी दिल्ली आणि मुंबई पोलीस या टोळीच्या कारवाया किती घातक आहेत हे ओळखून आहेत . 


तुरुंगातूनच सोशल मीडियावर पोस्ट शेअर
-लॉरेन्स बिश्नोईंचे वडील पंजाब पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. पण सुरुवातीपासून लॉरेन्स गुन्हेगारीकडे ओढला गेला . 
-रंगाने एकदम गोरा असल्यानं इंग्रजी भाषेतील लॉरेन्स हे सफेद रंगासाठी वापरलं जाणारं नाव त्याच्या आईने त्याला ठेवलं.
-हरियाणातील डी ए व्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लॉरेन्स कॉलजेच्या निवडणुकीत उभा राहिला . पण या निवडणुकीत त्याचा पराभव झाला . हा पराभव सहन न झाल्याने त्याने पिस्तूल खरेदी केलं आणि विरोधी बाजूच्या उमेदवारावर गोळीबार केला . 
-इथून लॉरेन्स बिश्नोईंचा गुन्हेगारी जगतातील प्रवास सुरु झालं. यावेळी त्याच वय फक्त19 वर्षे होतं  . 
-या निवडणुकीसाठी लॉरेंसने स्थापन केलेलं स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी अर्थात सोपू नावाचं संघटन अजूनही त्याच्यासाठी काम करत . 
-व्यायामाची आवड असलेल्या लॉरेंसन्सने त्याच्या दिसण्याचा आणि पिळदार शरीराचा उपयोग करून सोशल मीडियावर जाळं तयार केलंय . 
-वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तिहार जेलमध्ये बंदिस्त असलेला लॉरेन्स तुरुंगातून व्हॉट्सअप कॉलिंग द्वारे टोळीचा कारभार बघतो . तुरुंगात बसूनच हत्येची सुपारी घेतो आणि तुरुंगातूनच हत्येचा आदेश देतो . 
-एवढंच नाही तर तुरुंगातूनच केलेल्या गुन्ह्याची कबुलीही तो देतो . 
-सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याच्या टोळीचा हात असल्याची पोस्ट लॉरेन्स बिश्नोईंने तुरुंगातूनच सोशल मीडियावर शेअर केली होती . 


उत्तर भारतातील जंगल राज आणि लॉरेन्स
लॉरेन्स बिष्णोई हा उत्तर भारतातील जंगल राजचे ताजे उदाहरण आहे. तिथली पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची व्यवस्था किती  किडलेली आहे याचंही तो उदाहरण आहे. मोठा गुन्हा करा, त्याची तुरुंगात बसून कबुली द्या आणि त्याआधारे दहशत तसेच समर्थकांची संख्या वाढवत न्या असा त्याचा खाक्या आहे. म्हणूनच तुरुंगात कैद असताना त्याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तर रचलाच, शिवाय त्यानंतर व्यवस्थेच्या नावावर टिच्चून त्या हत्येची कबुली सोशल मीडियावरून स्वतःहून दिली. त्यानंतर जाग्या झालेल्या दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी त्याला तुरुंगातून ताब्यात घेतलंय.


राज्यातील तपास यंत्रणांची उडाली झोप 


मुसेवालाच्या हत्येच्या पाठोपाठ लॉरेन्स बिश्नोईंने सलमान खान आणि सलीम खान या पिता पुत्रांना मारण्याची धमकी दिल्याने वेगवगेळ्या राज्यातील तपास यंत्रणांची झोप उडालीय. काही वर्षांपूर्वी सलमान खानने राजस्थानमधील बिष्णोई समाजाला पूजनीय असलेल्या मोरांची शिकार केली होती आणि त्याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती. मात्र आता बिष्णोई समाजातील लॉरेन्स थेट सलमानच्या जीवावर उठलाय. स्वतः लॉरेंसने सलमानला मारण्याचा कट त्याने आखल्याचे नाकारलंय. पण त्याचा संपत नेहरा नावाचा साथीदार सलमानला मारण्यासाठी मुंबईत सलमान जिथे राहतो, तिथे येऊन रेकी करून गेल्याच पोलीस तपासात उघड झालंय. आणि म्हणूनच पंजाब पोलिसांपाठोपाठ दिल्ली आणि मुंबई पोलिसही सिद्धेश कांबळेच्या चौकशीसाठी पुण्यात पोहचलेत . 


तरुण मुल वळताएत गुन्हेगारीकडे


तारुण्याच्या उंबरठावरील मुलं सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या आकर्षणामुळे गुन्हेगारीकडे वळत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. पुण्यातील गजानन मारणेची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी उसळलेली गर्दी या चुकीच्या आकर्षणातून जमा झाली होती. लॉरेन्स बिश्नोईंने त्याच्याही पुढं जातं वेगवगेळ्या राज्यात शेकडो शार्प शूटरच जाळं विणलंय. एवढंच नाही तर परदेशातील गुन्हेगारांशीही त्याचे संबंध आहेत. त्यामुळं या गुन्हेगारीची पाळंमुळं उखडून टाकायची असतील तर या वेगवगेळ्या राज्यातील पोलिसांकडून एकत्रित तपास आणि कारवाई होणं आवश्यक आहे . तरच तरुणाईला या गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखणं  शक्य होणार आहे.