परभणी : बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असताना, राज्यातील विविध जिल्ह्यातून आणखी अशा घटना पुढे येत आहेत. आता, मराठवाड्यातील परभणीच्या मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शिक्षकाकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिसांच्या जनजागृती कार्यक्रमादरम्यान गुप्तपणे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तसेच शाळेच्या मुख्याध्यापकाकडूनही चौकशी केली असता ही बाब सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून सदर शिक्षकाविरोधात मानवत पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या शिक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे.
मानवत पोलिसांच्या निर्भया पथकाकडून विविध शाळांमध्ये जनजागृती अभियान राबवले जात आहे. याचं अनुषंगाने मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि सय्यद फयाज हे मानवत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता 8 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलत असताना इथल्या विद्यार्थी व विधार्थिनींनी आमची आमच्या शिक्षकांबद्दल तक्रार आहे आणि आम्ही आमच्या तक्रारी शाळेच्या तक्रार पेटीत टाकल्या असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने तपासणी केली असता त्यात तक्रारी होत्या. शाळेतील शिक्षक दत्ता होगे हे नेहमी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अश्लील भाषेत बोलून छडीने मारहाण करत असल्याचे समोर आले. पोलिसांकडून ही बाब मुख्याध्यापकांना कळविण्यात आली, त्यानंतर मुख्याध्यापकांनाही याबाबतची चौकशी केली आणि यानंतर मानवत पोलीस ठाण्यामध्ये मुख्याध्यापक श्रीमती छाया उमाजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शिक्षक दत्ता होगे यांच्या विरोधामध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा मातुर यांनी या शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत शासन व पोलीस प्रशासन अधिक गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, समाजात अशा घटना कमी होत नसल्याचं दुर्दैव आहे. पुरोगामी महाराष्ट्र असल्याचे सांगत आपण महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असल्याचं आपण म्हणतो. मात्र, महाराष्ट्रातील महिला व बाल लैंगिक अत्याचाराच्या या घटना शरमेनं मान खाली घालायला लावत आहेत.
हेही वाचा
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट