Mumbai Crime : शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादातून बापलेकाने एका महिलेवर गोळीबार (Firing) केल्याची घटना शनिवारी (29 एप्रिल) मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) इथे घडली. फरजना फिरोज असे या महिलेचं नाव असून तिचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. मानखुर्द पोलिसानी याबाबत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सोनू सिंह (वय 55 वर्षे) आणि त्याचा मुलगा अतीश सिंह (वय अंदाजे 25 वर्षे) हे हत्या केल्यानंतर पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


दोन कुटुंबांमधील भांडणानंतर गोळीबार


मानखुर्द मंडळा इंदिरानगरमध्ये शनिवारी ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. दोन कुटुंबांतील महिलांमध्ये आधी भांडण झालं. त्यात आधी मारहाण झाली. या दरम्यान एका महिलेच्या पती आणि मुलाने गोळीबार केला. ज्यात फरजना फिरोज हिच्या छातीत गोळी लागली. यानंतर महिलेला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


पोलिसांनी काय माहिती दिली?


पोलिसांच्या माहितीनुसार, "मानखुर्द परिसरातील गोळीबारात फरजना फिरोज नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. आधी दोन कुटुंबामध्ये मारहाणीची घटना घडली मग गोळीबार झाला. सीसीसीव्ही फूटेजची तपासणी सुरु आहे आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे."


तर परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितलं की, मानखुर्द परिसरात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. याच दरम्यान एका महिलेचा पती आणि मुलाने गोळीबार केली. आम्ही दुसऱ्या कुटुंबातील महिलेचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटवली आहे. ते सध्या पसार झाले असून त्यांच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. 






संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


दरम्यान ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्त भांडण करत येत आहे. काही क्षणात महिला तिथून पळ काढताना दिसते आणि त्यानंतर तिथे एकच गोंधळ झालेला दिसत आहे. गोळी मारणाऱ्याचा चेहराही सीसीटीव्ही फूटेजमध्येष्ट दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.