Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati SambhajinagarCity) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली असून, लुटमारीच्या उद्देशाने दोन युवकांनी फायनान्स सर्व्हिसेच्या कार्यालयात शिरुन गोळीबार (Firing) करत मालकाला लुटण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या गोळीचा नेम चुकल्यामुळे फायनान्स चालक थोडक्यात बचावला. विशेष म्हणजे पहिला राऊंड फायर केल्यानंतर पिस्तुलची स्प्रिंग तुटल्यामुळे दुसरी गोळी झाडता आली नाही. त्यामुळे घटनास्थळी स्प्रिंगसह तीन जिवंत काडतुसे सोडून आरोपींनी पळ काढला. ही घटना शुक्रवारी रात्री 8.48 वाजता सिडको एन-2 परिसरातील ठाकरेनगरमध्ये जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस कार्यालयात घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एपीआय कॉर्नरवरील जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस नावाचं कार्यालय आहे. दरम्यान या कार्यालयात शुक्रवारी रात्री दोन युवक पेट्रोल पंपाकडून पायी चालत आले. त्यातील एकाने कार्यालयात प्रवेश केला आणि दुसरा बाहेर थांबला. कार्यालयात जाताच आलेल्या तरुणाने पिस्तुल काढून थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. मात्र सुदैवाने ती गोळी प्रिंटरवर जाऊन लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विलास घाबरून गेले.
गाडीच्या काचाही फोडल्या
दरम्यान, गोळीबार केल्यावर लुटारू तरुणाने गल्ल्यातील दोनशे रुपये काढून घेतले. त्यानंतर आणखी पैसे काढ असा विलास यांना दम दिला. तसेच ओरडत असतानाच पिस्टलमधून दुसरी राऊंड फायर करण्याच्या प्रयत्न केला असतानाच पिस्तुलची स्प्रिंग तुटली. त्यामुळे स्प्रिंगसह आतमधील तीन जिवंत काडतुसे कार्यालयाच्या समोर पडले. एकीकडे हा सर्व राडा सुरू असताना दुसऱ्या साथीदाराने कार्यालयाच्या समोर असलेल्या एका गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर एक युवक ठाकरेनगरच्या दिशेने पळून गेला तर दुसरा एका कारमध्ये फरार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पाच पथके स्थापन
कार्यालयात लुटारूंनी घातलेल्या गोंधळानंतर विलास राठोड यांनी तात्काळ 112 नंबरवर फोन करून गोळीबारची माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळातच पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी निरीक्षक विठ्ठल ससे, जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, प्रविण वाघ, अजित दगडखैर, गजानन सोनटक्के यांच्यासह मोठ्याप्रमाणात पोलिसांनी धाव घेतली. तर आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेने पाच पथके स्थापन केली असून, लुटारूंचा शोध सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये गोडाऊनला भीषण आग, बचावकार्य सुरु