India: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे जम्मू आणि काश्मीरच्या (Kashmir) दौऱ्यावर असताना त्यांनी दहशतवादाविरोधात भाष्य केलं आहे. दिवसेंदिवस भारत अधिक बलशाली होत आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तसेच, देशात दहशतवादाविरोधात अनेक कारवाया करण्यात येत आहेत आणि देशातील दहशतवाद्यांना संपवण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. गरज पडल्यास सीमेच्या बाजूला असणाऱ्या आणि सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर हल्ला करुन त्यांचा खात्मा भारत करू शकतो, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी बोलताना दिला.
भारताने संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात सहिष्णुतेचा अर्थ सांगितला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. पुलवामा आणि उरी या दोन्ही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या होत्या, त्यावेळी पंतप्रधानांनी अवघ्या 10 मिनिटांत सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला होता, यावरून त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसून येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. त्यावेळी सैन्याने केवळ आपल्या बाजूच्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केलं नाही, तर त्यांचा खात्मा करण्यासाठी सीमेपलीकडे देखील गेल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
मुस्लिम देशांसह संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकत्र : संरक्षणमंत्री
मुस्लिम देशांसह संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकत्र आलं आहे आणि दहशतवाद संपवण्याशी सहमतही आहे. काश्मीरचा पोपट करून पाकिस्तान काहीही साध्य करु शकत नाही, त्याऐवजी त्यांनी आपलं घर व्यवस्थित ठेवावं, असा टोलाही यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी लगावला आहे. सोमवारी जम्मू विद्यापीठात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारच्या काळात दहशतवादाविरुद्ध मोठ्या कारवाया : संरक्षमंत्री
आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारताने मोदी सरकारच्या काळात दहशतवादाविरुद्ध मोठ्या कारवाया केल्या आहेत, 2016 मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई सुरू केली आणि पहिल्यांदाच देशासह जगाला दहशतवादाविरुद्ध सहिष्णुतेचा अर्थ सांगितल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.
भारताचे सीमावर्ती शहर उरीमधील लष्कराच्या छावणीवर सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर मोदींच्या निर्णयानंतर 15 दिवसांत, भारतीय लष्कराने सीमेपलीकडे सर्जिकल स्ट्राइक केले आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट केल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. फेब्रुवारी 2019 मध्ये, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात चाळीस CRPF जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर, भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानमधील बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. जम्मू-काश्मीरला दीर्घकाळापासून दहशतवादाचा फटका बसला असल्याचंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
मागील यूपीए सरकारवर निशाणा साधत राजनाथ सिंह म्हणाले, पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी हजारो निरपराधांचे बळी घेतल्यानंतरही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात ते अपयशी ठरले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून दहशतवादाचं नेटवर्क कार्यरत आहे. तर या नेटवर्कला कमकुवत करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं देखील राजनाथ सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :