Chardrapur Suicide : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील दोन चिमुकल्यांना विष देत पित्यानेही आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक विवंचनेतून हे सर्व झाल्याचे उघड झाले आहे. वरोरा शहरातील बोर्डा गावात कांबळे कुटुंब राहत होते. संजय कांबळे, त्यांची पत्नी, सहा वर्षीय स्मित आणि तीन वर्षीय मिष्टी असे कुटुंब. यातील पिता संजय कांबळे घरीच खाजगी शिकवणी वर्ग घेत होता. तर पत्नी एका महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे.


कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली


कोरोना आधी संजय कांबळे यांचे शिकवणी वर्ग उत्तम चालत होते. मात्र कोरोनानंतर शिकवणी वर्ग ठप्प झाले. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविणं अशक्य झाल्यानं त्यांनी अनेकदा निराशा व्यक्त केली होती. मला ही मुले पोसता येत नसतील तर त्यांचा जीव घ्यावा लागेल असंही त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ बोलून दाखविलं होतं. शुक्रवारी घरात कुणीही नसताना स्मित आणि मिष्टी या दोघांनाही विष देत संपवून घराला कुलूप लावत संजय कांबळे फरार झाला होता. कामावरून घरी परतलेल्या कांबळे यांच्या पत्नीला हा सारा प्रकार कळताच तिनं मुलांना रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


मुलांना विष देत पित्याची आत्महत्या


ही दुर्दैवी घटना लक्षात घेता पोलिसांनी तपासाची दिशा आणि वेग वाढवत शोध पथकं गठीत केली आणि फरार आरोपीचा शोध चालवला. यात खबरी जाळ्याच्या माध्यमातून त्यांना वर्धा जिल्ह्यातल्या गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखरा शेतशिवारात एक मृतदेह आढळल्याची बातमी मिळाली. हा मृतदेह संजय कांबळे याचाच असल्याची पुष्टी झाली. स्वतः विषप्राशन करत संजय कांबळेने आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.


आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल


बेताची आर्थिक स्थिती, कोरोना काळानंतर बिघडलेले कौटुंबिक बजेट आणि महागाईचा फटका यामध्ये कुटुंबाचा गाडा हाकणं अवघड झाल्याची स्थिती या घटनेनं स्पष्ट केली आहे. कांबळे यांनी घेतलेल्या टोकाच्या पाऊलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. अशा स्थितीत कोणालाही समुपदेशन आवश्यक असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केलं आहे. मात्र आर्थिक विवंचनेमुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त झालं हे मात्र नक्की.


महत्त्वाच्या इतर बातम्या