Chandrapur News : चंद्रपूर (Chandrapur) शहरातील दोन तरुणांनी चंदीगड (Chandigarh) इथे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांच्या सख्ख्या पुतण्याचा समावेश आहे. महेश अहिर (वय 26 वर्षे) असं हंसराज अहिर यांच्या पुतण्याचं नाव असून हरीश धोटे (वय 27 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या दुसऱ्या तरुणाचं नाव आहे. चंदीगड शहरातील कजेहडी भागातील जंगल परिसरात बुधवारी (22 मार्च) एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळून आले. 


आत्महत्या करणारे दोन्ही तरुण जिवलग मित्र असून 14 मार्चपासून चंद्रपूरातून बेपत्ता होते. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये जात असल्याचं सांगून ते घराबाहेर पडले होते. परंतु ते दोघे उज्जैनमध्ये पोहोचले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही झाला नाही. यानंतर कुटुंबियांनी 15 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरु असून या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


घटनास्थळावरुन दारुची बाटली जप्त


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाटसरुने याबाबत माहिती दिली. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चंदीगड येथील सेक्टर 52 मधील जंगलात दोन तरुण झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना सेक्टर 16 येथील शासकीय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना मृतांकडे प्रवासाची तिकिटे जप्त केली. तिकिटावरुन असं स्पष्ट होतं की दोघेही बुधवारी सकाळी उत्तराखंडमधील डेहराडून इथून बसने शहरात पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन दारुची बाटली आणि ग्लास जप्त केलं आहे.


मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत


नैऋत्य विभागाचे डीएसपी चरणजीत सिंह विर्क यांनी सांगितलं की, "दोघांच्याही मृतदेहांवर जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत." ते म्हणाले की, "आम्ही या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करत आहोत. महेश अहिर हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे मोठे बंधू हरिश्चंद्र अहिर यांचा मुलगा होता. महेश आणि हरीश या दोघांचेही मृतदेह आज (23 मार्च) रात्री उशिरा चंद्रपूरला आणले जाण्याची शक्यता आहे." 


चंद्रपुरात मंदिरात झोपलेल्या दोन ग्रामस्थांचा खून, दानपेटीही गायब


तर दुसरीकडे चंद्रपुरात मंदिरात झोपलेल्या दोन ग्रामस्थांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली गावात ही घटना घडली. मांगली गावाशेजारी जगन्नाथ बाबांचे छोटे मंदिर आहे. याच मंदिरात झोपलेल्या मधुकर खुजे (वय 55 वर्ष) आणि बापूराव खारकर (वय 65 वर्षे) यांचा खून झाला. या दोन्ही शेतकऱ्यांची मंदिराच्या शेजारी शेती असून राखण करण्यासाठी ते मंदिरात झोपायचे. काल रात्री देखील मंदिरात झोपायला गेलेल्या या दोघांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आज पहाटे आढळले. मृतावर कशाने वार करण्यात आले याबाबत अजून अनिश्चितता आहे. तसंच मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. भद्रावती पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.