Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या तहसीलदारांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेच्या फिर्यादीवरून काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बोरूडे असं गुन्हा दाखल झालेल्या तहसीरदारांचं नाव आहे. 


कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचून रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करुन तेथे उपस्थित परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तहसीलदार ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी कामावर हजर असतात की नाही हे पाहण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला असल्याची फिर्याद परिचारिकेने दिली आहे. या तक्रारीनंतर कोपरगाव पोलीस ठाण्यात विजय बोरूडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.   
 
शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान तहसीलदार विजय बोरूडे आपल्या चालकासह ग्रामीण रुग्णालयात पोहचले. त्यांनी रूग्णालयात पोहोचल्यापासून आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात व्हिडीओ देखील बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तहसीलदार एका वॉर्डबॉयसह आत जातात आणी ड्युटीवर कोणकोण आहे याची विचारपूस करतात. ड्युटीवर हजर असणाऱ्या परिचारिकेकडं हजेरीपत्रकाची मागणी करून ड्युटीवर कोण डॉक्टर आहेत याबद्दल विचारपूस करत आहेत. डॉक्टर हजर नसल्याने त्यांनी डॉक्टरला फोन लावायला सांगितले. संबंधित परिचारीकेने फोन केल्यानंतर ड्युटीवर नसणाऱ्या डॉक्टरांना फोनवरून झापलं, हा सर्व संवाद मोबाईल कॅमेर्‍यात कैद झालाय.  


दरम्यान, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात रजिस्टर नंबर 90/23 , भादंवी कलम 354, 504 आणि 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.


मुद्दाम तक्रार दिल्याची चर्चा


दरम्यान, तहसीलदार विजय बोरूडे हे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी कामावर हजर असतात की नाही याची झाडाझडती घेत होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई झाली तर काय होईल या भीती पोटी तहसीलसदारांवर मुद्दाम गुन्हा दाखल झालाय का? असाही प्रश्न निर्माण उपस्थित केला जात असून यावरून आता जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तपासानंतरच खरं काय ते समोर येईल, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा, तब्बल 19 जाणांवर गुन्हा दाखल