Buldhana Crime : बुलढाण्यात पोलिस की खाकीतील खंडणीखोर? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण वर्दीतील रक्षकच भक्षक ठरत असल्याचा धक्कादायक (Buldhana Crime) प्रकार चिखली तालुक्यात उघडकीस आलाय. ज्यामध्ये कर्नाटकातून आलेल्या वाहन चालकांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पाच वाहतूक पोलिसांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Buldhana Police) दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे खाकी वर्दीतील या पोलिसांचे गुन्हेगारी स्वरूप चव्हाट्यावर आले आहे.
कारवाई टाळण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी
पुढे आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज अ. रहमान (वय 23 वर्ष) हे अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहीम अब्दुल कादिर आणि जुबेर अहमद जाफर या सहकाऱ्यांसह आपल्या कारने मलकापूरकडे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते. दरम्यान, चिखली- बुलढाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती 'पेटीएम'द्वारे जवळच असलेल्या चहावाल्याकडे 1500 रुपये दिल्यानंतर त्यांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली.
वाहनातल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी, 2 लाख रुपयांची मागणी
मात्र, यानंतर काही अंतरावर ताज रहमान यांना आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत पुन्हा त्यांचे वाहन अडवले. वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी तब्बल 2 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे ठरले. ते क्युआर कोडद्वारे भरण्याचे सांगण्यात आले. मात्र ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी वाहनात बसलेल्या दोन पोलिसांनी 'पैसे नको, पण आम्हाला उतरवा' असे सांगितले. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. मात्र लगेच वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात झाला.
पाच पोलिसांवर गुन्हा दाखल
दरम्यान या प्रकरणी त्यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली असून, पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामधे यामध्ये अभय टेकाळे चिखली पोलीस स्टेशन, गजानन भंडारी (जिल्हा वाहतूक शाखा), विठ्ठल काळुसे, विजय आंधळे, संदीप किरके (तिघेही महामार्ग मदत केंद्र) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या कृतीचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत होईल अशाप्रकारे धमकावणे किंवा हल्ला करणे, शारीरिक इजा करण्याची धमकी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनासंदर्भातील विशेष कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: