Delhi Crime News: नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi News) बुरारी (Burari Case) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर 16 वर्षांच्या अल्पवयीनं मुलाला संताप अनावर झाला आणि त्यानं मनाशी पण केला. जगातील सर्व मुली त्याच्यासाठी शत्रू झाल्या. याच संतापातून त्यानं मुलींवर केमिकल अटॅक करण्यास सुरुवात केली.
देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतील बुरारी परिसरातील एका शाळेजवळ आरोपींनी ज्या मुलीवर केमिकल अटॅक केले, ती मुलगी आरोपीला ओळखतही नव्हती. तो तिला कधी भेटलीही नव्हती. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर अल्पवयीन विक्षिप्त प्रियकरानं रॅन्डमली मुली निवडायचा आणि त्यांच्यावर केमिकल अटॅक करायचा. अखेर आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.
दिल्लीतील या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, रविवारी बुरारी भागातील शाळेजवळ एका मुलीवर ॲसिडसारखं केमिकल फेकण्यात आलं, याप्रकरणी 16 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलगी शास्त्री पार्क एक्स्टेंशन येथील एका शाळेत तिच्या 10 वर्षीय चुलत भावाला घेण्यासाठी गेली होती, त्याचवेळी तिच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं यासंदर्भात बोलताना सांगितलं की, आरोपी मुलानं केमिकल अटॅक केल्यानंतर मुलीच्या डोळ्याला, मानेला आणि नाकात जळजळ होऊ लागली, तिला अंगाला खाज येऊ लागली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच दिवशी पोलिसांना या घटनेची माहिती दिली, त्यानंतर बुरारी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 326 (बी) आणि 341 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
असा झाला विक्षिप्त तरुणाच्या कृत्याचा खुलासा
केमिकल अटॅकनंतर मुलीला दिल्लीतील बुरारीमधील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरुणीवर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी तीन पथकं तयार केली. पीडित तरुणीनं पोलिसांना सांगितलं की, ती हल्लेखोर तरुणाला अजिबात ओळखत नाही किंवा त्याचं तिच्याशी यापूर्वी कोणतंही भांडणही झालं नव्हतं. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावणं पोलिसांना अवघड झालं होतं. पोलीस उपायुक्त या प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले की, "दुर्दैवानं जिथे ही घटना घडली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. त्यामुळे तपास करणं सोपं काम नव्हतं.
पोलिसांनी सांगितलं की, यानंतर सोशल मीडियावर त्या तरुणाचं प्रोफाईल, त्याचा इतिहास, त्याची फ्रेंडलिस्ट आणि इतर बाबी तपासण्यात आल्या. दुसऱ्या टीमनं गुन्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या सहा रस्त्यांचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आणि नीट पाहिलं. आजूबाजूच्या संभाव्य मार्गांचं मॅपिंग केलं. तिसरी टीम, साध्या वेशात शाळेजवळ तैनात होती. काळजीपूर्वक तपास केल्यानंतर, गुन्ह्याच्या ठिकाणापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये पळून गेलेल्या एका मुलाची ओळख पटली. जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा त्याचं वर्णन आरोपीच्या वर्णनाशी जुळणारं होतं."
अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीनं काय सांगितलं?
यानंतर पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन आरोपीला पकडलं. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मुलानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलानं प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर असे गुन्हे करण्यास सुरुवात केल्याचं तपासात समोर आलं आहे. तो पीडितेला ओळखतही नाही आणि प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने असे गुन्हे करण्यास सुरुवात केली.
आरोपीनं सांगितलं की, त्यानं कोणताही विचार न करता पीडित मुलीची निवड केली होती. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "हल्ल्यामध्ये वापरलेली कॉस्टिक पावडर, पाणी, एक छोटी बाटली, कपडे, पिशवी आणि रुमाल मास्क असे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीनी घातलेले कपडेही जप्त करण्यात आले आहेत."