पुणे :  पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याला तब्बल 52 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांनी या मांत्रिकाला जालन्यातून अटक केली. पोलिसांचे पथक जेव्हा या मांत्रिकाच्या घरी पोहोचलं तेव्हा  मांत्रिकाच्या घरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी एकत्र करून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना सापडल्या. 


जालन्यातील मांत्रिक किसन पवार माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असं आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. मांत्रिकांची आणि व्यावसायिकाची पुण्यातील धायरीत राहणारा एका व्यावसायिकाची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. नंतर तोच व्यावसायिक मांत्रिकांच्या भूलथापा आणि आमिषाला बळी पडला. त्याने एक - दोन लाख नव्हे तर तब्बल 52 लाख रुपये या मांत्रिकाला पैशाचा पाऊस पाडण्यासाठी हळूहळू देत गेला. सलग तीन वर्षे हा सगळा प्रकार सुरू असताना विश्वास दाखवण्यासाठी मांत्रिकाने खेळणीतील पैशाचा वापर केला. नोटांचा पाऊस पाडल्याचे भासवून व्हिडीओ आणि फोटो चित्रित करत व्यवसायिकाला पाठवत होता. मात्र त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने पुणे पोलिसांत अखेर धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन मांत्रिकावर विविध गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या आहे. 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी वर्षानुवर्षे आवाहन करण्यात येते. परंतु तरी देखील पैशाच्या लोभापायी अनेक नागरिक आजही अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडत असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होते. या सगळ्या कारवाईनंतर अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, बळी पडलेले असाल तर पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पुणे पोलिसांनी आवाहन केल आहे.


झटपट पैसे मिळवण्याचा लोभ असलेल्या  राज्यात निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारे भोंदूगिरीने लुबाडणूक  केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनांकडून करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या :


मेळघाटात अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके, प्रकृती गंभीर


काळ्या जादूवर उपचारासाठी सहा लाखांची कबुतरे! पुण्यात दोन भोंदूबाबांवर गुन्हा दाखल


ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर? भिवंडीतील भिनार येथील खळबळजनक प्रकार समोर