धुळे: गेल्या काही दिवसांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक मोठ्या कारवाया केल्याची माहिती आहे. अशातच माध्यमिक शिक्षण विभागात वेतन अधीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या मीनाक्षी गिरी यांना तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribe Case) अटक केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांची पत्नी महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 30 नोव्हेंबर 2023 च्या निर्णयानुसार एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता मंजूर झाला. पुणे येथील शिक्षण संचालकांनी त्यांचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक कार्यालयाच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, थकीत वेतन तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला ते अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी अधीक्षक मीनाक्षी गिरी यांची कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध कारणे दाखवून तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीचे थकीत वेतन अदा केले नाहीत.
त्यामुळे दहा ते वीस दिवसांपूर्वी तक्रारदाराने थकीत वेतन अदा करण्याबाबत गिरी यांना विनंती केली. त्यावेळी मीनाक्षी गिरी यांनी तक्रारदाराकडे दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्याकडे (Bribe Case) तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत मीनाक्षी गिरी यांना तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच (Bribe Case) स्वीकारताना रंगे हात अटक करण्यात आली, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
धुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदार दाम्पत्याला मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाच देण्याची मागणी केली होती. लाच (Bribe Case) देतानाची रक्कम कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. काल (बुधवारी) संध्याकाळच्या सुमारास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.