भिवंडी : सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येने भिवंडी हादरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाला.  परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना  भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील धापसीपाडा येथील एका पत्र्याच्या चाळीमध्ये घडली.  या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या चिमुरडीचे आई-वडील हे दोघेही भिवंडीतील एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे  13 सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. हत्या झालेल्या सहा वर्षीय मुलीसोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता. त्यावेळी चिमूरडी सकाळपासूनच बेपत्ता होती.  सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरवात केली,


त्यानुसार 14 तारखेला नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्ये सुद्धा पोलिसांनी सर्च ऑपरेशन घेतले होते. परंतु त्या ठिकाणी चिमुरडी आढळून आली नव्हती. (आज) शुक्रवारी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका बंद असलेल्या चाळीतील खोली मध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले आहे.


पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला आहे. घटनस्थळी ठाणे येथील ठसे तज्ञ पथक सुध्दा दाखल झाले असून,भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढवली जाईल असे सांगत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली असल्याची  माहिती घटनास्थळी भेट देणारे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.