भिवंडी : पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले आणि तिला बेदम मारहाण केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हा प्रकार केला. भिंवडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद रियाजुद्दीन (वय 53 वर्ष) असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे तर नूर जहान (वय 44 वर्ष) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रियाजुद्दीन व त्याची पत्नी नूरजहा यांच्यात वाद सुरू होते. पती रियाजुद्दीन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत. याच कारणामुळे पती रियाजुद्दीन हा आपल्या पत्नीपासून वेगळा राहत होता. नूरजहा आपल्या मुलांसह भिवंडी येथील गैबी नगर या परिसरात राहत होती. मात्र रियाजुद्दीन याचा संशय काही कमी झाला नाही आणि त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे. या भांडणाला कंटाळून पत्नीने पतीला घरात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे पती रियाजुद्दीन खूपच चिडला होता.
रागाच्या भरात त्याने नूरजहा घरात एकटी असताना घरात प्रवेश करून घरातच तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात नूरजहा गंभीर जखमी झाली. रियाजुद्दीनने जवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली. ज्यामुळे पत्नीच्या मदतीसाठी कोणी येऊ नये. अखेर खिडकीमधून बाहेर आवाज दिल्यानंतर रस्त्यावरील काही नागरिक तिच्या मदतीसाठी आले. पती रियाजुद्दीन याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देखील दिले.
रक्ताचा थारोळ्यात पडलेली पत्नी नूरजहाला तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिची परिस्थिती अतिशय गंभीर असल्या कारणाने तिला कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कळव्यात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची परिस्थिती चिंताजनक असून शांतिनगर पोलिसांनी पती रियाजुद्दीन याला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पतीविरोधात 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून शांतीनगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :