Bhiwandi Crime : दुचाकीवरुन आलेल्या झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉयचे टी-शर्ट आणि डोक्यात काळे हेल्मेट घालून भर रस्त्यातून बँकच्या कॅशिअरच्या हातातून 11 लाख 75 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग धूम स्टाईलने पळवणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आलं आहे. अरशद मोहम्मद इलियास मोह. मन्सुरी, (वय 22 वर्षे), अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी (वय 24 वर्षे), सैफअली मोह. मुस्तफा खान (वय 25 वर्षे) असं  अटक केलेल्या तिघांची नावं आहेत. 


भिवंडीतील (Bhiwandi) बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकचे कॅशिअर रिजॉय जोसेफ फरेरा आणि त्यांचे सेक्युरिटी हे दोघे एका दुचाकीवरुन 29 ऑक्टोबर रोजी दुपारी  बँकेची 11 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम आयडीबीआय बँक, कल्याण रोड शाखा इथे भरणा करण्साठी जात होते. त्याचवळी भिवंडी-कल्याण रोडला  लाईटच्या ट्रान्सफॉर्मजवळ, पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी आली. तेव्हा दुचाकीवरुन झोमॅटोचे टी-शर्ट घातलेले आणि दुसऱ्या दुचाकीवरील काळे हेल्मट घातलेल्या दोन आरोपींनी बँक कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक  दिली. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या  झोमॅटो टी-शर्ट  परिधान  केलेल्या आरोपीने बँक कॅशियरच्या हातातील बॅग खेचून कल्याणच्या दिशेने धूम स्टाईलने पळ काढला. या प्रकरणी बँक कॅशियरच्या तक्रारीवरुन  भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारुंवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. 


आरोपींचं मोबाईल लोकेशन उत्तर प्रदेशात
घटनेच्या दिवसांपासून पोलीस पथकाने भिवंडी ते कल्याण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यापैकी आरोपी हे भिवंडी-कल्याण मार्गावरील एका  टेलरच्या दुकानात गेल्याचं समोर आले. त्यानंतर पोलीस पथकाने या टेलरकडे अधिक चौकशी केली असता, त्यामधून आरोपीचं नाव पोलिसांना समजलं. त्यानंतर घटनास्थळ आणि अन्य ठिकाणचे मोबाईल लोकेशन घेऊन तांत्रिक तपास सुरु केला. त्यावेळी  आरोपींचे मोबाईल लोकेशन उत्तर प्रदेशमधील  लखनौमध्ये असल्याचं दाखवलं. यानंतर सपोनि पवार आणि तपास पथक ताबडतोब लखनौला दाखल होऊन तिथल्या एसटीएफ पथकाची मदत घेत आरोपी   अरशद मन्सुरी, अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी यांना ताब्यात घेतलं. 


आरोपी यूपीमधून ताब्यात
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसंच त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन लाख रुपये रोख रक्कमेसह गुन्हा करताना  एकमेकांशी संभाषण केलेले तीन मोबाईल फोन हस्तगत केले. उत्तर प्रदेशमध्येच ट्रान्झिट रिमांड घेऊन आरोपींना भिवंडी इथे आणून 9 नोव्हेंबर रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले. कोर्टाने आरोपींना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. गुन्ह्यातील  तिसरा आरोपी सैफअली मोह. मुस्तफा याचं मोबाईल लोकेशन उत्तर प्रदेशमध्येच दाखवत होते. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करुन त्याच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली.  


टेलरकडे गेल्याने आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले 
अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी हा गुन्ह्यातील मास्टरमाईंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. गुन्हा करण्यापूर्वी आरोपी अब्दुल  सईद हा भिवंडीतील  आयडीबीआय बँकेत गेला होता. त्यावेळी बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँकचे कर्मचारी या बँकेत रोज दुपारच्या सुमारास लाखोंचा भरणा करण्यासाठी दुचाकीवरुन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्याने इतर दोन आरोपींसोबत बँकेच्या कॅशियरच्या हातातील बॅग हिसकावून पळण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने झोमॅटोचे 2 टी-शर्ट, दुचाकी आणि बॅगची जमवाजमव करुन 29 ऑक्टोबर 11 लाख 75 हजार रुपयांची रोकड भरस्त्यातून कॅशियरच्या हातातून पळवली होती. मात्र कपडे घेण्यासाठी टेलरकडे गेल्याने पोलिसांच्या तावडीत सापडले. 


9 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
तिन्ही आरोपीकडून आतापर्यंत गुन्ह्यातील आठ लाख रुपये आणि गुन्हा करताना वापरलेले 3 मोबाईल फोन (किंमत 33 हजार) तसंच एक लाखांची बजाज पल्सर  कंपनीची दुचाकी, एक चाकू, झोमॅटोचे 2 टी-शर्ट आणि बॅग असा एकूण 9 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसंच गुन्ह्यातील इतर रक्कम आणि या आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवार   करत आहेत.