Bhiwandi Crime News :  कर आकारणीसाठी लाच स्वीकारणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना अटक करण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या कर मूल्यांकन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांसह विभागातील कार्यालयीन अधिक्षिका सायरा बानो अन्सारी, प्रभारी लिपिक किशोर केणे या तिघांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने पालिका अधिकारी कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे सुदाम जाधव यांनी एक दिवसाआधीच बनावट तूप बनविण्याच्या कारखान्यावर कारवाई केली होती. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नागाव येथील एका विकसित केलेल्या 13800 चौरस फूट क्षेत्रफळाचे  मालमत्तेवर कर आकारणी करण्यासाठी तक्रारदाराने पालिका कर मूल्यांकन विभागात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी कर मूल्यांकन विभागातील सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव ,कार्यालय अधिक्षिका सायरा बानो अन्सारी व प्रभारी लिपिक किशोर केणे यांनी संगनमत करून तक्रारदारांकडे प्रती चौरस फूटा मागे 15 रूपयांप्रमाणे दोन लाख 7 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती  दीड लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.


त्यानंतर तक्रारदाराने नवी मुंबई येथील लाचलुचपत विभागात धाव घेऊन आपली कैफियत मांडली. पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शासकीय पंचांसह पालिका मुख्यालयात सापळा कारवाई केली. या कारवाईत सुदाम जाधव, सायरा बानो अन्सारी आणि किशोर केणे यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पालिका वर्तुळात आणि अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


मागील सहा महिन्यापासून कर मूल्यांकन विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असल्या बाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मंगळवारी भिवंडी शहरात इदगाह सॉल्टर हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट तूप बनविण्याच्या कारखान्यावर छापा कारवाई करणाऱ्या सुदाम जाधव, सायरा बानो अन्सारी यांच्यावरच 24 तासात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून छापा कारवाई झाल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे.