Bhiwandi Crime News : भिवंडीत (Bhiwandi) कौटुंबीक वादातून एका दारुड्या पतीनं पत्नीला जिवंत जाळलं आहे. धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. भिवंडी तालुका पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 35 वर्षीय पतीला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 
          
भिवंडी शहरातील चाविंद्रा परिसरात दारुड्या पतीनं कौटुंबीक वादातून पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध पडली असता जळणासाठी साठविलेल्या लाकडांमध्ये टाकून जिवंत जाळलं. सदर घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कविता चौरसिया (वय 35) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव असून हत्या करणारा पती संतोष चौरसिया (वय 35) याला भिवंडी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्नी कविता आणि तिचा पती संतोष हे दोघंही त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा येथील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते. मोलमजुरी करणारा संतोष चौरसिया हा व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यानं काहीच काम करीत नव्हता. त्यामुळे दररोज पती-पत्नीमध्ये खटके उडायचे. बऱ्याचदा भांडण विकोपालाही जात असे. मंगळवार 7 जून रोजी देखील संतोष घरी दारू पिऊन आला, त्यावेळीही त्याचं पत्नी कविदासोबत भांडण झालं. 


वाद विकोपाला गेल्यानं संतोषनं पत्नीस लाकडी दांड्यानं मारहाण केली. तिचं डोकं लोखंडी कपाटावर आदळलं. यामध्ये कविता बेशुद्ध पडली असता तिची हालचाल न जाणवली नाही. पण पती संतोष एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं घराबाहेर पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्या जवळ तिला फरफटत नेलं. लाकडांसह बेशुद्ध पत्नीस जाळून तिची हत्या केली. याबाबत भिवंडी तालुका पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं अवघ्या काही तासांत फरार झालेला पती संतोष चौरसिया याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मयत कविताचा भाऊ भारत यानं पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानं दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष चौरसिया विरोधात हत्येसह पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयात हजर केलं असता आरोपीस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :