ठाणे : भिवंडी शहर आणि संपूर्ण पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास अटक केली. आरोपीजवळून सहा दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण 6 लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी एकूण दहा गुन्ह्यांची उकल केली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


भिवंडी शहरातील नारपोली व कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस पथक करत होते. वाहन चोरीच्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदाराकडील माहिती नुसार पोलिस शिपाई अमोल इंगळे यांना एका संशयित आरोपीचे नाव समजले. त्यानंतर पोलिस पथकाने मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास शहरातील खान कंपाऊंड शांतीनगर येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. 


त्यानंतर तपासात आरोपीने भिवंडी शहरासोबत वागळे इस्टेट, वर्तकनगर, मुंब्रा, शिळ डायघर, नौपाडा, कापूर बावडी या भागातून चोरी केलेल्या आठ वाहन चोरीच्या गुन्ह्यासह एक घरफोडी व एक मोबाईल चोरी असे दहा गुन्हे केले. पोलिसांच्या चौकशीत हे सर्व उघडकीस आले. 


दुचाकी गॅरेज मध्ये हेल्पर म्हणून काम करणारा मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. मागील पाच वर्षांपासून त्याच्या विरोधात 29 गुन्हे नोंद आहेत. या आरोपीस भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिली आहे.


ही बातमी वाचा :