Soybean Price: सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Farmers) चिंतेत आहेत. कारण सोयाबीनच्या दरात (Soybean Price) सातत्यानं घट होत आहे. हमीभावापेक्षा देखील सोयाबीनची कमी दरानं विक्री केली जातेय. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. कुठं सोयाबीनला 4000 रुपयांचा दर मिळतोय तर कुठं 3000 तर कुठं 2500 रुपयांचा दर सोयाबीनला मिळत आहे. 


हमीभावापेक्षाही मिळतोय कमी दर 


राज्यातील बहुतांश बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे 4 हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर एमएसपी 4600 रुपये प्रतिक्विंटल आहे. यावर्षी सोयाबीनची लागवड केल्याने शेतकरी पश्चाताप करत आहेत. कारण शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळत नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी संतप्त होताना दिसतायेत. सोयाबीन हे तेलबिया पीक आहे. त्यामुळं त्याची जितकी जास्त लागवड केली जाईल तितके ते देशासाठी चांगले आहे. कारण आपला देश खाद्यतेलाचा मोठा आयातदार आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना एमएसपीही मिळत नाही. हे तेलबिया पीक असल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळायला हवा होता. मात्र, सरकारने आपल्या धोरणांमुळे भाव कमी केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


परभणीच्या सेलू बाजारात सोयाबीनला फक्त 2250 रुपयांचा दर


सध्या परभणीच्या सेलू बाजारात सोयाबीनला फक्त 2250 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्याना बसला आहे. दुसरीकडे राज्यातील लासलगाव आणि विंचूर बाजार सनित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. सोयाबीन हे प्रमुख कडधान्य व तेलबियाचे पीक असूनही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.


जाणून घेऊयात कोणत्या बाजारात सोयाबीनला किती दर? 


लासगाव किमान भाव 3500 रुपये, कमाल भाव 4483 रुपये 
शहादा बाजार समिती किमान किंमत 3951 रुपये, कमाल 4200 रुपये 
राहाता किमान भाव 4410 रुपये, कमाल 4431 रुपये
सेलू 2250 ते 2500 रुपयांचा दर


मतपेटीतून शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष


नुकत्याच लोकभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कांदा बहुल भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना आस्मान दाखवलं आहे. जवळपास कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीच्या 7 उमेदवारांचा पराभव झाला आहे. तसेच दुसरीकडे विदर्भातही कापूस आणि सोयाबीन पट्यात उभ्या असणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. सरकारच्या शेती विरोधी धोरणाच्या विरोधात शेतकरी आता जागृक होताना दिसत आहे. यावेळी कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सत्ताधारी उमेदवारांच्या विरोधात कौल दिल्यानं अनेक उमेदवार पराभूत झाले आहे. त्यामुळं येणाऱ्या काळातही सरकारनं सावधगिरी बाळगावी, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.   


महत्वाच्या बातम्या:


तूर उत्पादकांना दिलासा, मात्र, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत, दरात कधी होणार वाढ?