Bhandara Crime News : आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश (Health Department bogus recruitment Racket) केला. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यातून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याच्या एकाचा तर, पुणे येथील एकाचा अशा दोघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट जॉइनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट सिक्केही पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल, असं अमरावती पोलिसांनी सांगितलं.

Continues below advertisement


Bhandara Crime News : काय आहे नेमकं प्रकरण?


भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार 15 लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. मात्र, तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यामुळं त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं. सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफिनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली. या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.



बीड (Beed) शहरात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत व्हेल माशाच्या उलटीची (Ambergris) तस्करी उधळून लावली आहे. सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चरहाटा फाटा परिसरात एका हॉटेलजवळ कारमधून हा व्यवहार होणार होता. शैलेंद्र शिंदे आणि विकास मुळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अत्तर आणि औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाला मोठी मागणी असल्याने त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते.