Beed Crime Updates : बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून सौर ऊर्जा पंप चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. याबाबत गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी गेवराई पोलिस ठाण्यात दिल्या होत्या. त्यानंतर आज पहाटे सौर ऊर्जा पंप चोरणारी टोळी गेवराई तालुक्यातल्या रानमळा शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर तब्बल चार तास थरारक पाठलाग करून पोलिसांनी या टोळीतील तिघांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडून  तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी केली आहे


बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सौर ऊर्जा पंप चोरीला जात होते आणि याच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपली गस्त वाढवली होती. त्यामध्ये अवजड वाहनाची तपासणी करत असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्‍यातील रानमळा शिवारात पोलिसांनी सौर पंप घेऊन जाणाऱ्या एका संशयित ट्रॅक्टरचा पाठलाग करायला सुरुवात केली. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचं लक्षात येतात ट्रॅक्टरमधील चोरट्यांनी शेतातून ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी देखील हार मानली नाही आणि आपली चार चाकी गाडी बाजूला उभा करून तीन मोटारसायकलवरून पोलीस या चोरट्यांचा पाठलाग करू लागले. 


काळ्या कुट्ट अंधारात चार तास या चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही माहिती गेवराई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे


चोरी करण्यात तरबेज असलेली ही टोळी गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने चोरी करून फरार व्हायची. मात्र पोलिसांनी पण वेगाने आपलं तपास चक्र फिरवलं आणि या टोळीवर कारवाई केली आहे. फक्त बीडच नाही तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील या टोळीनं आणखी किती गुन्हे केले आहेत याबाबत पोलीस तपास करत आहेत