Beed Crime : बीडमधील (Beed) जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) मुख्याध्यापकांच्या आत्महत्येप्रकरणी (Suicide) 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असताना पैशांच्या तगाद्यामुळे कंटाळून त्यांनी आठवडाभरापूर्वी आयुष्य संपवलं होतं. भरत सर्जेराव पाळवदे असं आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचं (Principal) नाव होतं. ते केज तालुक्यातील जिवाचीवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.


5 डिसेंबर रोजी मुख्याध्यापकाची आत्महत्या


बीड शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर काही दिवसांपूर्वी एका मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्रीच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवलं होतं. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं.


सुसाईड नोटमध्ये 23 जणांचा उल्लेख 


भारत पाळवदे यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन यानंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या समोर एका हॉटेलच्या आडूला दोरीने गळफास घेतला. भरत सर्जेराव पाळवदे यांच्या मृतदेहाशेजारी तीन पानांची सुसाईड नोट सापडली होती. त्याचप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या तगाद्यामुळे भरत सर्जेराव पाळवदे यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. तीन पानांच्या या सुसाईड नोटमध्ये 23 जणांच्या नावाचा समावेश होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर 23 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पैशांसाठी तगादा लावल्याने भारत पाळवते यांची आत्महत्या


दरम्यान भरत पाळवदे यांनी ऊसतोड मजुरांना देण्यासाठी पैसे घेतले होते. पैसे देऊनही ऊसतोड मजूर कामावर येत नसल्याने त्यांच्याकडे अनेकांनी पैशासाठी तगादा लावला होता आणि याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.


दीड महिन्यापूर्वी शेतकरीच्या मुलाने मृत्युला कवटाळलं


शेतात काहीच न पिकल्याने शेतकरीपुत्राने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील देवगाव इथे 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. दीपक बाळासाहेब मुंडे (वय 20 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. देवगाव इथल्या दीपक मुंडेने मागील तीन वर्षांपासून शेती न पिकल्याने वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज आणि बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून टोकाचं पाऊल उचललं होतं.