Baramati Crime News : बारामतीत (Baramati) कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय. त्यामागील कारण म्हणजे, टोल नाक्यावर ओळखपत्र मागितले म्हणून टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला चक्क उठाबशा काढायला लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला आरटीओच्या गाडीतून आलेल्या व्यक्तीनं या उठाबशा काढायला (Crime News) लावल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे.
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावरील टोल नाक्यावरचा हा प्रकार असून हे प्रकरण उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आरटीओने केलेल्या कृत्याच्या विरोधात बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई केलात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
तीन दिवसापूर्वी आरटीओमध्ये काम करणारी एक व्यक्ती एका खाजगी गाडी घेऊन बारामती तालुक्यातील उंडवडी येथील टोल नाक्यावर आली. त्यावेळी तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने त्या आरटीओला अडवलं. त्यावेळी मी आरटीओत काम करत असल्याचे त्या संबंधित व्यक्तीने सांगितले. त्यावेळी टोल नाक्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला ओळखपत्र मागितलं. त्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेली. मात्र, ओळखपत्र मगितल्याचा राग मनात ठेवला आणि त्यानंतर काल दुपारी बाराच्या दरम्यान उंडवडी येथील टोल नाक्यावर आरटीओची गाडी आली. परंतु त्या गाडीने टोलनाका पार केला नाही. टोलनाक्यावर गाडीने यु टर्न घेतला.
त्यानंतर गाडीतून खाली उतरून गाडीत आलेले टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासू लागेल. त्यावेळी तिथल्या मॅनेजरने त्यास मज्जाव केला. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याने आरटीओला ओळखपत्र मागितले होते. त्या कर्मचाऱ्यांची काल सुट्टी होती, परंतु तो काल कामानिमित्त टोल नाक्यावर आला होता. त्यानंतर त्या टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला बोलावलं आणि त्याला उठाबशा काढायला लावल्या असल्याचे टोल नाक्याचे मॅनेजर संतोष खापरे यांनी सांगितले.
कॅमेरा नाही त्या ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या
दरम्यान, या प्रकरणातील उठाबशा काढतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले नाहीत. कारण ज्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी उठाबशा काढायला लावले असल्याचे टोल नाक्याचे मॅनेजर संतोष खापरे यांनी सांगितले. आरटीओने केलेल्या कृत्याच्या विरोधात बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरटीओचे बजरंग कोरावळे यांनी उठाबशा काढायला लावले असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. आता आरटीओ या वर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या