Baramati Crime : बारामती तालुक्यातील पारवडी येथे पित्यानं सावत्र मुलाचा कोयत्यानं वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकानं वनविभागाच्या झाडीत लपलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी याबाबत माहिती दिली होती.
पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सावत्र मुलाचा खून करुन पसार झालेल्या पित्याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर 3 तासाच्या आत आरोपीला अटक करुन पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पारवडी गावच्या पोलीस पाटीलांनी पारवडी गावच्या हद्दीत शिपकुले वस्ती येथे कातकरी समाजातील एकानं स्वत:च्या मुलाचा कोयत्यानं डोक्यात वार करुन खून केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढवाण हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहचले होते. यावेळी आरोपी मारुती साधुराम जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावचे हद्दीत आला असून त्यानं त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्या रागात मारुती जाधव यानं स्वत:च्या मुलाच्या डोक्यात आणि मानेवर कोयत्यानं वार करत खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.
गुन्हेशोध पथकानं तात्काळ आरोपी अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरु केली. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्यानं त्याचा शोध घेणं कठीण होतं. तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्यानं आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नव्हता. सदर आरोपी अटक करणं जिकीरीचं काम होतं. गुन्हेशोध पथकानं पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सूचनेप्रमाणे, घटना स्थळापासूनचा वनविभागाचा 10 ते 15 किमीचा टप्पा पायी चालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस अवघ्या 3 तासांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं.
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Crime : बोगस तृतीयपंथी बनून लोकांना गंडा, वैद्यकीय चाचणीनंतर सत्य चव्हाट्यावर, पोलिसांकडून बेड्या
- मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, आरोपीला अटक
- Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून 3.8 कोटी उकळले, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
- Mumbai Drug Case: आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती