Maharashtra Monsoon Session 2024: मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) बाजी मारली. तर, महायुतीची (Mahayuti) गणितं फसल्याचं पाहायला मिळालं. अशातच लोकसभ निवडणुकांच्या निकालानंतर उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session 2024 LIVE) सुरुवात होत आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. या शेवटच्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीति आखली आहे.


उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखली आहे. उद्यापासूनचं अधिवेशन राज्य सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असल्याचं असं म्हणत, ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर, पुणे ड्रग्ज प्रकरणात अधिवेशन रोखून धरणार, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवला आहे. तसेच, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी देखील राज्य सरकारचं  भ्रष्टाचाराचं प्रकरण उकरून काढून ते आक्रमकपणे मांडा, अशा सूचना दिल्यात. 


पुणे ड्रग्ज प्रकरणात भाजप सरकार उघडं पडलंय, फडणवीस सपशेल अपयशी ठरलेत : वैभव नाईक 


ड्रग्ज प्रकरणात अधिवेशन रोखून धरणार, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवला आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफिया आणि भाजप सरकार उघडं पडलं आहे. पुण्यात यापूर्वीसुद्धा ड्रग्ज प्रकरणं झाली आहेत. काही दिवसांपूर्वी हिट अँड रन प्रकरणसुद्धा ड्रग्ज या विषयातून झालं आहे. त्यामुळे नाटक करण्याचं काम हे सरकार करत आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैभव नाईक यांनी केली आहे. त्यामुळे लोकांचं लक्ष वळवण्यासाठी नितेश राणे प्रयत्न करत असतील तर जनतेला माहीत आहे. भाजपकडे राज्याचं गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री पद असताना काही झालं नाही. मागील अडीच वर्षात या प्रकरणी काही केलेलं नाही. त्यामुळे नितेश राणे यांनी लोकांचे लक्ष विचलित करू नये असा टोला नितेश राणे यांना देखील वैभव नाईक यांनी लगावला आहे.


महायुती म्हणून सभागृहात एकसंघ राहा; काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या सूचना


महाविकास आघाडीनं अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वानं राज्यातील नेत्यांना सक्त सूचना केल्यात की, विधानसभा निवडणुका आधी होणाऱ्या राज्य सरकारच्या या पावसाळी अधिवेशात राज्य सरकारचं  भ्रष्टाचाराचं प्रकरण उकरून काढून ते आक्रमकपणे मांडा. तसेच, राज्य सरकारचा कारभार भ्रष्ट आहे, असा संदेश जनतेत जाऊ द्या, त्यासाठी महायुती म्हणून सभागृहात एकसंघ राहा. लहान भाऊ, मोठा भाऊ या वादात पडू नये आणि त्यावर कोणीही भाष्य पण करू नये, अशा सूचना राज्यातील सर्वच उपस्थित नेत्यांना काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत. 


ठाकरेंनी कंबर कसली, आज अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक 


ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्र्यातील ताज लँड हॉटेलला बैठक आयोजित करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचं शेवटचं अधिवेशन असल्यानं या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची रणनिती काय असणार? यावरही चर्चा होणार आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दलही आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत.  


गुरुवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन 


उद्या म्हणजेच, गुरुवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता उद्यापासून सुरु होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सूरू होत आहे. या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. 


राज्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळं यंदाचा अधिवेशनात विरोधकांचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे. 


विरोधक कोणते मुद्दे मांडू शकतात?



  • मराठा विरुद्ध ओबीसी वाद 

  • पुण्यात सापडलेले अंमली पदार्थांचे अड्डे 

  • पॉर्शे अपघात प्रकरण 

  • घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना 

  • कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव 

  • पावसाचा खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती 

  • राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था 


राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद जोरात आहे. त्यातच मनोज जरांगे यानी मराठा आरक्षणात सगेसोयरेचा समावेश करण्याची केलेली मागणी, ओबीसींनी 54 लाख कुणबी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी हे मुद्दे खासकरून सरकाराला मोठया प्रमाणात अडचणीत आणण्याची शक्यता आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बंदी घातल्याच पाहिला मिळालं. 


विरोधक आक्रमकपणे लढाई लढण्याची शक्यता पाहता सत्ताधारी देखील हल्ले परतवून लावण्याच्या तयारीत असल्याचं पाहिला मिळतं आहे. राज्यातील जनतेची साहनभुती आपल्या बाजूने वळण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा सत्ताधारी पक्ष करण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणजे मध्य प्रदेश प्रमाणे सरकार राज्यात लाडली बेहना योजना घोषित करू शकतात 


मागील काही दिवसांपासून अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरू असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे. सरकारमधील हा बेबनाव झाकून अधिवेशनाला एकसंधपणे सामोरे जाण्याच आव्हान सत्ताधारी पक्षासमोर असणार आहे. 


सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार


पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असताना सरकार गंभीर नसल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे.