Bank Fraud Case : केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) 34 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी काल (शुक्रवारी) छापेमारी केली. यादरम्यान सीबीआयनं 40 कोटी रुपयांची पेटिंग्स आणि मूर्ती जप्त केल्यात. या पेटिंग्स आणि मूर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे. सीबीआयनं जून 2022 मध्ये गुन्हा नोंदवून या प्रकरणी छापा टाकला होता. या प्रकरणातील एका आरोपीचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील (Chhota Shakeel) शी संबंध असल्याचंही उघड झालं आहे. 


सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेबिका दीवान आणि अजय रमेश नावंदर यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. बँक घोटाळ्याचे पैसे आरोपींनी इतर लोकांनाही दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात या दोघांची नावं समोर आली आहेत.


काल ज्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली, त्या रेबिका दीवान याप्रकरणातील  मुख्य आरोपी कपिल वाधवान यांच्या निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयनं काल महाबळेश्वर आणि मुंबईतील काही ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान, अनेक महागडे पेटिंग्स आणि मूर्ती जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त संशयास्पद कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही सीबीआयकडून जप्त करण्यात आली आहेत.


एका पेटिंगची किंमत 25 कोटी रुपये 


सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जप्त करण्यात आलेल्या या पेटिंग्समध्ये तैय्यब मेहता यांच्याही पेटिंग्सचा समावेश आहे. तैय्यब मेहता हे अत्यंत प्रसिद्ध चित्रकार असून त्यांच्या पेटिंग्ससाठी कोट्यवधींची बोली लावली जाते. प्राथमिक अंदाजानुसार, जप्त करण्यात आलेल्या एकाच पेंटिंगची किंमत 25 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.


प्राथमिक तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, काल ज्या दोन व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर बँक घोटाळ्याचे पैसे पाठवण्यात आले होते. दरम्यान, पेटिंग आणि मूर्ती यांच्या मूळ किमतींचे लवकरच मूल्यांकन केलं जाईल.


अंडरवर्ल्ड कनेक्शन काय? 


सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ज्या लोकांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एकाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. तसेच, याप्रकरणी आतापर्यंत जवळपास दीड डझन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयला प्राथमिक चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एकाचे संबंध कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्यासोबतही आहेत. 


सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणाचा थेट अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध असल्याचं उघडकीस आलेलं नाही. परंतु, या प्रकरणात सहभागी असलेल्या एका आरोपीचे मात्र अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. 


सीबीआयनं 17 बँकांच्या समूहाला 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत 22 जून 2022 रोजी एफआयआर दाखल केला होता आणि या प्रकरणी त्याच दिवशी तब्बल 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोप आहे की, सर्व नियम धाब्यावर बसवून आरोपींनी बँकेतून घेतलेली रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली, त्यामुळे बँकांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.