ठाणे : दोन चिमुकले जीव, शाळेत दफ्तर घेऊन जातात, अगदी रोजच्या प्रमाणे. पण त्यादिवशी या चिमुकल्या शाळेतून घरी आल्या आणि शाळेचं नाव जरी काढलं तरी त्यांच्या अंगावर काटा उभा राहू लागला. रोज न चुकता शाळेत जाणाऱ्या या मुली शाळेत जायला नकार का देतायत? अशा प्रश्नाने पालकांच्या मनात पाल चुकचुकली आणि मग सुरू झाला शोध. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. या अत्याचाराची अंगाचा थरकाप उडवणारी बदलापूर फाईल्स, कसं आणि काय घडलं वाचा टाइम टू टाइम रिपोर्ट.
1. बदलापूरची संतापजनक घटना कशी घडली?
12 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत तीन वर्षे आठ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पुन्हा एका सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
2. प्रकार उघडकीस कसा आला?
यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला. तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.
3. कोणत्या शाळेत घडली घटना?
ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमांतून शिक्षण दिले जाते. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित तर तर इंग्रजी माध्यमाचे वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200 च्या आसपास आहे
4. पोलिसांनी कशी केली दिरंगाई?
आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर दोन्ही मुलींचे पालक प्रचंड हादरले. त्यांनी 16 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी केला.
5. पोलिस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली आणि दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचले. अखेर अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली
6. कोण आहे नराधम अक्षय शिंदे?
24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच अक्षय शिंदेंने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
7. शाळेकडून कोणती चूक झाली?
मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे का दिली नाही? असा संतप्त सवाल पालकांनी विचारला. आरोपीला फाशी द्या, नाहीतर आमच्या हवाली करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं.
8. बदलापुरात कसा झाला उद्रेक?
संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आंदोलकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर शाळेचं गेट तोडून आंदोलक आत घुसले आणि शाळेमध्ये तोडफोड केली. त्याचसोबत आंदोलकांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेऊन रुळावर तीव्र आंदोलन केलं. शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवलं.
9. पोलिसांवर काय कारवाई झाली?
गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. तसेच, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले.
10. बदलापूरचा तपास कसा होणार?
बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून ज्येष्ठ IPS अधिकारी आरती सिंह या त्याच्या प्रमुख असतील. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत.
ही बातमी वाचा :