Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरू आहे का? असा प्रश्न सुरू झाला आहे. पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका जाहीरपणे मांडल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, हा आमचा प्राधान्यक्रम नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. 


महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार


आता पुन्हा एकदा आपल्या शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार आहे. आज (20 ऑगस्ट) सद्भावना दिनानिमित्त काँग्रेसकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबई असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरे गटाकडून आग्रह केला जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची उद्या बैठक होणार असून या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून सावध भूमिका


महाविकास आघाडीच्या 16 तारखेला झालेल्या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांना मुख्यमंत्रीपदा जाहीर करावा, त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून सावध भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. 


उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 


भाजपच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलून दाखवली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या