Yuvraj Singh Biopic Announced : टीम इंडियाचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील या दिग्गज खेळाडूच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्शने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. 


युवराज सिंगच्या आधी महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांच्या बायोपिक बनल्या आहेत. आता युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा झाल्याने युवीच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. तरण आदर्शने सांगितले की, भूषण कुमार-रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.






युवराज सिंगची कशी आहे कारकीर्द?


मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील युवराज हा सर्वोच्च कामगिरी करणारा खेळाडू होता. 203 धावा आणि 12 विकेट घेणारा युवराज 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवडला गेला होता. यानंतर युवराज सिंगने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. 


2011 मध्ये जेव्हा टीम इंडियाने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला तेव्हा युवराज सिंगला मॅन ऑफ द टूर्नामेंट निवडण्यात आले. याशिवाय युवराज सिंगने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. या स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात 6 षटकार मारून विक्रम केला होता.


युवराज सिंगची क्रीडा कारकीर्द


युवराज सिंगने टीम इंडियासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. युवराज सिंगने कसोटीत एकूण 1900 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये युवराजने एकूण 8701 धावा केल्या आहेत, ज्यात 14 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय युवराज सिंगने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1177 धावा केल्या आहेत.


कॅन्सरवर केली मात


युवराज सिंग 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेदरम्यान त्याला कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रासले होते. वर्ल्ड कपनंतर युवराजने या आजाराबाबत खुलासा केला तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. यानंतर युवराज सिंगच्या कॅन्सरवर बोस्टन आणि इंडियानापोलिसमध्ये उपचार करण्यात आले. मार्च 2012मध्ये त्याने कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर मात केली आणि क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले.


कोण असणार हिरो?


या बायोपिकमध्ये युवराज सिंगची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही, मात्र चित्रपटात युवराज सिंगची भूमिका सिद्धांत चतुर्वेदी साकारू शकतो, असे मानले जात आहे. युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. आता यासाठी सिद्धांत चतुर्वेदीला ऑफर दिली जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इनसाइड एज या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये सिद्धांतने क्रिकेटरची भूमिका साकारली होती.