मुंबई : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. दोन चिमुकल्यांवर शाळेत पाशवी अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनासह पोलिस प्रशासनाकडूनही हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. या घटनेला आठवडा उलटला तरी, या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्यानं पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. यानंतर मंगळवारी बदलापूरमधील जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. या प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जबाबदार धरलं आहे.


भास्कर जाधवांनी फडणवीसांना डिवचलं


शिवसेना ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून घटना घडल्या." या प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी गृह खातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री आणि गृह खात्याचं वचक नसल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.


बदलापूर अत्याचार प्रकरणावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया


भास्कर जाधव म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काही झालं की, चारही बाजूंनी बोलायचे. देवेंद्र फडणीस यांचा अजिबात गृह खात्यावर वचक नाही, मध्यंतरी लोकसभेचे कारण सांगून ते राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं आपल्या कारकीर्दीचा भांडा फुटणार आहे. पोलिसांवर वचक नाही म्हणून पोलिसांची हिंमत वाढत आहे. त्यांना वाटतं, आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमची बाजू सावरून घेतील".


"गृहमंत्र्याचा वचक असा हवा"


नागपूर पोलीस चौकी जुगार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील परिस्थिती बघितली तर, खून, बलात्कार, दोन नंबरचे धंदे सगळ्यात जास्त नागपूरमध्ये आहेत. गृहमंत्री असा पाहिजे त्याची नुसती नजर फिरली, तरी पोलिसांच्या माना खाली झुकल्या पाहिजे. पोलिसांवर कंट्रोल नाही ठेवला तर, हे क्रूर होतील, हिंस्र होतील, रानटी होतील, पोलिसांना गृहखात्याचा दरारा पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kolkata Doctor Case : कोलकाता निर्भया प्रकरणात न्याय मागणाऱ्या अभिनेत्रीलाच बलात्काराची धमकी, मिमी चक्रवर्तीच्या पोस्टनं वेधलं लक्ष