Kolkata Rape-murder Case Accused : पश्चिम बंगालच्या कोलकातामधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेध संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे. याच्या विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलनं सुरु आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच सीबीआयही या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.


कोलकाता निर्भया प्रकरणात न्याय मागणाऱ्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी


या प्रकरणात विविध स्तरातील दिग्गज लोकांनी निषेध करत न्याय देण्याची मागणी केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या घटनेचा निषेध करत कठोर भूमिका मांडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनीही या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यानंतर आता पीडितेसाठी न्याय मागणाऱ्या अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.


अभिनेत्री मिमी चक्रवर्तीच्या पोस्टने वेधलं लक्ष


तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिने सांगितलं की, तिने कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणासंदर्भात पोस्ट शेअर केल्यापासून तिला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत आहेत आणि अश्लील मेसेज येत आहेत. मंगळवारी, 20 ऑगस्ट रोजी मिमी चक्रवर्तीने एक्स मीडिया अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. तिने स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. 


मिमी चक्रवर्तीने शेअर केले स्क्रीनशॉट्स






 


सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर कोलकाता डॉक्टर हत्याकांडात न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अभिनेत्री आणि माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनी इतर चित्रपट कलाकारांसह 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या खून आणि बलात्कार प्रकरणाचा निषेध केला तेव्हा तिला सोशल मीडियावर बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळू लागल्या. मिमी चक्रवर्तीसह रिद्धी सेन, अरिंदम आणि मधुमिता सरकार यांनीही हत्याकांडा घटनविरोधात प्रतिक्रिया दिली होती.


मिमी चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर तिला मिळालेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'आणि आम्ही महिलांना न्याय मागतोय? यापैकी येथे काहीच नाही. मुखवटा घातलेले महिलांसोबत उभं राहण्याबद्दल बोलत असलेल्या, गर्दीचा भाग असलेल्या विकृत मानसिकतेच्या पुरुषांकडून बलात्काराच्या धमक्या येणं, हे सामान्य झालं आहे. कोणत्या प्रकारचेंसंगोपन आणि शिक्षण याची परवानगी देते?’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.