Badlapur Encounter : ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कृत्याचे काही जणांकडून समर्थन केलं जात असून काहींनी अशाप्रकारे आरोपींना ठार मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित करत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत माहिती देताना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळी (Firing) झाडल्याचं म्हटलं आहे. मात्र, आमच्या मुलाला साधी गाडी चालवायला येत नव्हती, त्याने फटाकड्याही नीट उडवता येत नव्हत्या. तो बंदूक काय चालवणार अशी प्रतिक्रिया आरोपी अक्षय शिंदेच्या (akshay Shinde) पालकांनी दिली आहे. या घटनेवरुन आता राजकारण चांगलंच तापलं असून ठाणे पोलीस (Police) आयुक्तालयाकडून संबंधित घटनेचा सिनेस्टाईल थरार सांगण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने प्रेस नोट जारी करत घडलेली घटना सांगितली. तसेच, आरोपी अक्षयकडून पोलिसांची बंदूक हिसकावरुन गोळीबार करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, आज 23 सप्टेंबर 2024 रोजी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 380/2024 कलम 65(2),74,75,76 भा.न्या. संहिता सह कलम 4(2),8,10 पोक्सो अॅक्ट तसेच गुन्हा रजि.नं 391/2024 कलम 65(2),74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम 4(2).6.8.10.21(2) पोक्सो अॅक्ट या गुन्हयात अटक व सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी नामे अक्षय अण्णा शिंदे, वय 24 वर्षे यास बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं 409/2024 कलम 377,324,323,504 भा.द.वि या गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक है तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंटसह गेले होते. 


मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं


प्राथमिक माहिती नुसार, सायंकाळी सुमारे 05.30 वाजता आरोपी यास नमूद पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले व त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. च्या दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता, सदर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राउंड सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 02 राऊंड इतरत्र फायर झाल्याचे ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. 


स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून गोळी झाडण्यात आली


स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकान्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास लागून तो जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस सपोनि निलेश मोरे व आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास उपचारकामी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, कळवा येथे आणले असता, डॉक्टरांनी तपासून सपोनि निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे रेफर केले. मात्र, आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास तपासून मृत घोषित केले. सदर मृत आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहितीही ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.