मुंबई : मुंबईतील मोठे राजकीय नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba siddique) यांची काही दिवसांपूर्वीच भरवस्तीतील ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्र हादरला,एका माजी मंत्र्यांना अशाप्रकारे ठार मारल्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी आणि मुंबईत अवैध शस्त्रांचा होत असलेल्या पुरवठ्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. मात्र, मुंबईतील (Mumbai) गुन्हेगारी व अवैध शस्त्रास्त्रांची, पिस्तुलांचे खरेदी-विक्री हा गंभीर विषय बनला आहे. त्यातच, राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष 7 शाखेने दोन पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि लाखोंच्या गांजासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. इम्रान यासीन खान इनामदार उर्फ लोच्या आणि निलेश रामचंद्र बने(32) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष 7 ला भांडुपमध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने या ठिकाणी धाड टाकून त्याला अटकही केली, त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक काडतुस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता निलेश बने नावाच्या आरोपीकडे देखील पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे धाड टाकली असता त्याच्याकडून 1 पिस्तुल 6 जिवंत काडतुसे आणि 38.7 किलो गांजा असे, असा तब्बल 16 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध कलमान्वयने गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास गुन्हे कक्ष 7 कडून करण्यात येत आहे.
हेही वाचा
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी