मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वय हे 17 असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला आहे. तर आधारकार्डनुसार त्याचं वय हे 19 असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आरोपीचे नेमकं वय किती हे तपासण्यासाठी त्याचं आधारकार्ड न्यायमूर्तींकडून मागवण्यात आलं. 


बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारलं असता त्याने स्वत:चं वय 17 असं सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रिमेंट मिळावी यासाठी आरोपींच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली. आरोपीच्या वकिलांकडून त्याचे वय 17 असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर आधारकार्डनुसार आरोपीचं वय 19 असल्याचा पोलिसांचा दावा आहे.  


बनावट आधारकार्ड तयार केल्याचा दावा


आधारकार्डनुसार त्याचं वय 19 आहे, मात्र आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याचं वय 17 आहे. आरोपीच्या वकिलांकडे वयाबाबत पुरावे नाहीत असा दावा सरकारी वकिलांनी केला. आरोपी अशा गुन्ह्यात अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात असा दावा सरकारी वकिलांनी केला. 


आरोपी वयाचा खुलासा करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे. सरकारी वकिलांकडून आरोपीच्या 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. 


सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय? 


यातील आरोपीने पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं, वाहन कोणी दिलं याचा तपास होणं महत्वाचं आहे. या आरोपींकडून 28 जिवंत काडतूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की आणखी कोणाला मारण्याचा हेतू होता याचा तपास झाला पाहिजे. 


यातील अन्य दोन आरोपी फरार आहेत. हे कुठल्या गॅगशी जोडलेले आहेत का? निवडणुका तोडांवर आहेत, यांच्या निशाणा कोणावर होता हेही कळेल. त्यामुळे आम्हाला 14 दिवसाची कोठडी मिळायला हवी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 


आधी गुन्ह्यातील तपास पहावा, त्यात काही मिळतयं का त्या आधारावर पुढील कस्टडी द्यावी. पुण्यात हे आरोपी काय करत होते, कोणाकडे राहात होते याचा तपास दहा दहा टीम करत आहेत.  तरीही त्याची माहिती मिळत नाही. एखाद्या पिच्चर मधील स्टोरी प्रमाणे हा कट रचलेला आहे. 


आरोपी आपली नावंही तपासात वेगवेगळी सांगत आहेत. पोलिसांकडील आधारकार्ड दाखवले असता त्यावरील तारखेनुसार जन्मतारीख 21 होत आहे. आरोपीनी ज्यांना मारलं आहे ते राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.