मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या दिशेने पिस्तुलातून एकूण सहा राऊंड फायर केले होते. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या छातीत घुसल्या होत्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या लागून जखमी झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 'मला गोळ्या लागल्यात, मी वाचणार नाही, माझा मृत्यू होईल', हे बाबा सिद्दीकींच्या तोंडातून बाहेर पडलेले शेवटचे शब्द होते, अशी माहिती अजित पवार गटातली एका नेत्याने दिली.
वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला त्यादिवशी विजयदशमी होती. त्यामुळे येथून अनेक देवीच्या मूर्ती वाजतगाजत विसर्जनासाठी (Navratri 2024) नेल्या जात होत्या. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी मारेकरी अर्धा तासापेक्षा जास्तवेळ या परिसरात थांबून राहिले होते. विसर्जन मिरवणुकीतील देवीभक्तांना मोफत सरबत वाटले जात होते. मारेकऱ्यांनी हे सरबत प्यायले होते.
बाबा सिद्दीकी सकाळी 11 वाजता झिशान यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि झिशान यांनी एका स्थानिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानंतर संध्याकाळी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी कार्यालयातच नमाज अदा केली. त्यानंतर झिशान हे बाबा सिद्दीकींना सांगून काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी चेतना कॉलेजच्या दिशेने निघाले. त्यावर बाबा सिद्दीकी म्हणाले, मीदेखील दोन-तीन मिनिटांत काम संपवून निघत आहे. त्यानंतर रविवारी नौपाड्यात एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे भेटू, असे सांगून झिशान सिद्दीकी निघून गेले.
मारेकरी सरबत पीत सिद्दीकींची वाट पाहत होते,पोलिसांची माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, मारेकरी हे झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर देवीच्या मिरवणुकीत वाटण्यात येणारे सरबत पीत उभे होते. बाबा सिद्दीकी त्यांचा कार्यकर्ते, पोलीस सुरक्षारक्षक, गाडीचा चालक यांच्यासोबत कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा
बाबा सिद्दीकींच्या घरावर फायरिंग झाल्याची आवई कोणी उठवली? मुंबई पोलिसांनी ती फाईल पुन्हा ओपन केली